आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before March New Policy For IT Industry Industry Minister Subhash Desai

आयटी उद्योगांसाठी नवे धोरण मार्चपूर्वी आणणार - उद्योगमंत्री सुभाष देसाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे नवे आयटी उद्योगांचे (माहिती तंत्रज्ञान) धोरण येत्या मार्चपूर्वीच तयार होईल. त्यासाठी आयटी क्षेत्रातील दादा कंपन्या मानल्या जाणा-या टाटा, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्याकडून उपयुक्त सूचना घेतल्या जातील, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
राज्यात येत्या २-३ वर्षांत सुमारे पाच लाख कोटींच्या नव्या औद्योगिक गुंतवणुकीचे लक्ष्य उद्योग विभागाने ठेवले असून त्यातून २० लाख नवे रोजगार निर्माण होतील. मात्र, उद्योगांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी विजदर सवलतीसह आणखीही काही सुविधा पुरविण्याचे प्रयत्न होतील, अशी ग्वाही उद्योगमंत्र्यांनी या वेळी दिली. आयटी उद्योगांसाठीच्या धोरण तयार झाल्यास या क्षेत्रातील गुंतवणूकीला राज्यात आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशात महाराष्ट्र अग्रेसर असले तरी मेक इन महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी उद्योगांना इझी टू बिझनेस असे वातावरण निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत. उद्योगांसाठी यापूर्वी अनेक सवलती जाहीर झाल्या असल्या तरी आमच्यापुढे खरे आव्हान उद्योगांना लागणारे परवाने, त्यासाठी होणारा अनावश्यक विलंब, शेजारी राज्याच्या तुलनेत महागडी वीज, पर्यावरणाचे परवाने आदी महत्त्वाचे विषय कौशल्याने हाताळण्याचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक मानांकनात महाराष्ट्राचे खालावलेले स्थान उंचावून महाराष्ट्राला क्रमांक १ च्या दिशेने नेण्याचे आहे. उद्योगांची मागणी असलेल्या भागात जमिनीची पुरेशी उपलब्धता नाही. तर जेथे जमिनी उपलब्ध आहेत, तेथे उद्योजकांचा कमी प्रतिसाद आहे. केंद्राच्या नव्या भूसंपादन कायद्यामुळे भूसंपादनात प्रचंड अडचणी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी नव्या सरकारने तात्काळ काही उपाययोजना केल्या आहेत. उद्योगांना ६० ते ७० प्रकारचे परवाने लागायचे. आता त्यांची संख्या २५ वर आणली गेली आहे. त्यातही एक खिडकी व्यवस्था लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. या धोरणांमुळे राज्यातील उद्योगांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात उद्योगाचे प्रयत्न
विदर्भात ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित एखादा उद्योग यावा, यासाठी राज्य शासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या काही दिवसात या प्रयत्नांना यश येऊन चांगली बातमी मिळेल, असे संकेत उद्योगमंत्र्यांनी दिले. ऑटोमोबाईल उद्योग आल्यास पूरक उद्योगांनाही चालना मिळू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अ‍ॅडव्हांटेज परिषद होणार
विदर्भात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी २०१३ मध्ये अ‍ॅडव्हांटेज विदर्भ परिषद नागपुरात झाली. त्यातून विदर्भाचे मार्केटिंग होण्यास मदत झाली. या वेळीही अशा परिषदेचे नियोजन असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.