आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhendawal News In Marathi, Weather, Jalgaon, Divya Marathi, Lok Sabha Election

अबकी बार... नवे पण अस्थिर सरकार!, भेंडवळ येथील घटमांडणीत भविष्‍यवाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) - यंदा देशात सत्तांतरासोबतच अस्थिर सरकार आणि लहरी हवामाचा फटका बसून सर्वसाधारण पिके येतील, असे भाकीत जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या भेंडवळ येथील घटमांडणीतील नैसर्गिक बदलाने स्पष्ट केले आहेत. रब्बीमध्ये गहू पीक चांगले राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घटमांडणीत रात्रभरात नैसर्गिकरीत्या झालेल्या बदलाच्या आधारावर चंद्रभान महाराजांचे 11 वे वंशज पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी शनिवारी सूर्योदयसमयी वर्षभरातील पीकपाण्याच्या अंदाजासोबतच राजकीय, आर्थिक स्थितीची भाकिते वर्तवली. अक्षय्य तृतीयेला संध्यासमयी गावातील नरहरी वाघ यांच्या शेतात ही घटमांडणी करण्यात आली. घटमांडणीत रात्रभरातून झालेल्या बदलाच्या आधारावर भाकीत करण्यात आले.

* घटमांडणीत असा झाला बदल
सत्तांतर । राजा बदलणार
घटमांडणीत दोन बाय दोनच्या खड्ड्यामध्ये ठेवण्यात आलेल्या नागवेलीच्या पानावरील सुपारी बाजूला पडलेली आढळली, तर पानावर माती पडलेली होती. परिणामस्वरूप ‘राजा’ बदलून सत्तांतर होणार असल्याची शक्यता
व्यक्त करण्यात आली.
अस्थैर्य । राजाच्या गादीवर माती
सत्तांतर होणार असले तरी पानावर अर्थात
राजाच्या गादीवर माती पडलेली असल्याने सत्तेतील पक्षाची डळमळीत अवस्था असेल. त्यामुळे राजकीय क्षेत्र ढवळून निघेल, असे भाकीत या वर्षी करण्यात आले.
अरिष्ट । करंजी, पुरी गायब
अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून बघितली गेलेली करंजी (कानोला) घटातून गायब झाल्याने आर्थिक संकट देशावर ओढवेल, असा अंदाज आहे. पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरीही गायब झाल्याने महापूर, सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
लढाई । मसूर, करडीत बदल
सांडोळी, कुरडईचे तुकडे झाल्याने चाराटंचाई जाणवेल. मसूर व करडीमधील बदल पाहता संरक्षण व्यवस्था मजबूत राहणार असली तरी दहशतवाद, शत्रूची देशात घुसखोरी सुरूच राहणार असल्याचे संकेत आहेत.