आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द्वेषाची दुनिया बदले, माणुसकीचा ध्यास गझल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागाव - ‘मानवी जीवनाची समीक्षा, त्यावर प्रभावी भाष्य करण्याची ताकद साहित्यातच आहे. त्यातील सर्वोत्तम माध्यम हे गझल आहे. साहित्य जगण्याशी समांतर असले पाहिजे, गझल तर मानवी जीवनाचे संदर्भ घेऊनच वाटचाल करत आहे. माणसाच्या जीवनात आशावाद जिवंत ठेवण्याची जबाबदारी गझलने निभावली आहे. माणसात अभावाने आढळणारी माणुसकी काळजात पेरण्याची जबाबदारी गझलने खांद्यावर घेतलीय,’ अशी प्रतिक्रिया गझलगायक भीमराव पांचाळे यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली. तालुका पत्रकार संघातर्फे येथे आयोजित 'माणुसकीचा ध्यास गझल' या मैफलीसाठी महागाव येथे भीमराव पांचाळे आले होते. या वेळी त्यांच्यासोबत साधलेला संवाद.

‘श्वास गझल नि:श्वास गझल
जगण्याचा विश्वास गझल
द्वेषाची दुनिया बदले
माणुसकीचा ध्यास गझल'
गझल केवळ वृत्त नसून ती वृत्ती आहे. रदीफ-काफियांची निर्जीव मांडणी किंवा शब्दांचे अवडंबर हा गझलचा स्वभाव नाही. या काळजातून उसळते आणि त्या काळजावर कोसळते ती गझल.

‘गजल में बंदिशे–अल्फाज ही नहीं सब कुछ
जिगर का खून भी चाहिये कुछ असर के लिये'
असा गझलचा जीवनवृत्तांत पांचाळे यांनी मांडला. गझलगायनाच्या क्षेत्राकडे कसे वळलात, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, प्रस्थापित पायवाटांनी प्रवास करणे माझ्या बंडखोर पावलांना मान्यच नव्हते. म्हणून मी स्वत:ची वेगळी पायवाट निर्माण केली. या पाऊलवाटेचा आता राजमार्ग झाला.

पायवाटा मी जगाच्या टाळल्या
मी पुढे, मागून रस्ता चालतो
अशी या वाटचालीची समीक्षा त्यांनी केली. महागावातील ही माझी दुसरी मैफल आहे. येथील रसिकांनी मला दिलेले प्रेम मी काळजाच्या कोपर्‍यात जतन केले आहे. महागाव, पुसद तालुक्यात मराठी गझल लिहिणारी सशक्त पिढी तयार झाली. पुणे, मुंबईपेक्षाही येथील गझल माणसाच्या जगण्याचे संदर्भ घेऊन लिहिली जात आहे. मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांनी युवा पिढ्यांकडून जी अपेक्षा केली होती, ती अपेक्षापूर्ती या गझलकारांकडून होईल, असा आशावादही भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केला. माझे जन्मगाव असलेल्या अष्टगाव येथे सातवे गझल संमेलन घेतले. तेथेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ‘गझलकार सुरेश भट' वाचनालय उभारत असून, तिथे गझलचे सर्व ग्रंथ व मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहे. आज मराठी गझल लिहिणारी सक्षम पिढी निर्माण झाली. परंतु गझल गायनाच्या क्षेत्रात दुष्काळ आहे. यासाठी गझलेचे गुरुकुल स्थापन करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

देशासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली गझल
मराठी गझल लिहिणारी पिढी तयार व्हावी, या ध्येयाने आजवर राज्यभरात १०६ कार्यशाळा घेतल्या, गझलवर १८ पुस्तके लिहिली, मुशायरे व गझल मैफलीही सातत्याने घेत आहोत. केवळ महाराष्ट्रातच किंवा देशातच नाही, तर १६ देशांमध्ये मराठी गझल मैफली गाजवल्या आहेत. आजवर अखिल भारतीय स्तरावर ८ मराठी गझल संमेलने घेतली आहेत, असेही पांचाळे यांनी सांगितले.