आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध लालबुंद , औषधीमूल्यांनी परिपूर्ण असलेली भिवापुरी मिर्चीला ब्रँड मिळणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- बारीक, लालभडक रंग, जहाल तिखटपणा तसेच अनेक औषधीमूल्यांनी परिपूर्ण असलेली भिवापुरी मिर्ची विदर्भात प्रसिद्ध आहे. केंद्र सरकारच्या रजिस्ट्रार ऑफ इंडिकेशन्स या संस्थेकडून लवकरच या मिर्चीला विशिष्ट भौगोलिक ओळख (जिओग्राफिकल इंडिकेशन्स टॅग) मिळणार असून ती यापुढे याच ब्रँडने ओळखली जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड आणि कुही हे तीन तालुके या मिर्चीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी दुर्लक्ष झाल्याने ही मिर्ची नामशेष होण्याच्या मार्गावर होती. कृषी विभागाच्या अ‍ॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीने (आत्मा) हालचाली करून या मिर्चीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यासाठी मूळ वाण गोळा करून ते शेतकरी गटांना वितरित करण्यात आले. त्यामुळे आता भिवापुरी मिर्चीचे उत्पादन पुन्हा वाढत आहे. आता स्थानिक शेतक-यांना याचा लाभ व्हावा यासाठी या मिर्चीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत कार्यरत रजिस्ट्रार ऑफ इंडिकेशन्स या विभागाच्या भौगोलिक ओळख यादीत स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षी सुमारे २३० एकर क्षेत्रात या मिर्चीची लागवड झाली असून पुढील हंगामात हे क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याचे ‘आत्मा’च्या नागपूर प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

गडद लाल, तिखटही... : जहाल तिखट चवीसाठी भिवापुरी मिर्ची प्रसिद्ध आहे. आकार अतिशय बारीक असून रंग गडद लाल आहे. साल जाड असल्याने टिकाऊ आहे. मिर्चीची लांबी अंदाजे दीड इंच असते. गडद लाल असल्याने खाद्यपदार्थांनाही चांगला रंग येतो. हे तिखट तुलनेने कमी वापरावे लागते. उत्पादनासाठी या मिर्चीला एकदाच पाणी द्यावे लागते. याशिवाय पिकाच्या देखभालीवरदेखील अत्यल्प खर्च येतो. शेतक-यांना एकरी १० ते १५ क्विंटलचे उत्पादन मिळते. मध्य प्रदेश, दिल्ली, चेन्नई तसेच कोलकाता भागात या मिर्चीचा व्यापार चालतो. याशिवाय या मिर्चीची निर्यात करण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर उपाययोजना सुरू आहेत.

औषधी गुणही...: भिवापुरी मिर्ची औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. हाडांच्या वेदना, पचनसंस्थेच्या समस्या, फुप्फुसातील जळजळ, डोकेदुखी अशा अनेक समस्यांवर ती गुणकारी ठरली आहे. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज घटवण्यासाठीही या मिर्चीचा वापर होतो. या मिर्चीमुळे पित्तही वाढत नाही.

सौंदर्य प्रसाधनातही वापर : मिर्चीतील भडक लाल रंग आणणारा ओलिओरेसीन हा घटक लिपस्टिक, नेल पॉलिश आणि अन्य सौदर्य प्रसाधनांच्या निर्मितीसाठी वापरला जातो. व-हाडी ठेचा तयार करण्यासाठी या मिर्चीचा हमखास वापर होतो. सावजी खाद्यपदार्थ झणझणीत करण्यासाठीही भिवापुरी मिर्ची वापरली जाते.

असा असेल ब्रँड
 *विशिष्ट भौगोलिक ओळख म्हणून मान्यता मिळाल्यास भिवापुरी मिर्ची एक ब्रँड म्हणूनच ओळखला जाईल.
  *मिर्चीचे उत्पादनही तीन तालुक्यांपुरते घेता येईल. इतरत्र ते घेतल्यास भिवापुरी मिर्ची या ब्रँडने ती विकता येणार नाही.
  *भविष्यात भिवापुरी िमर्ची ब्रँड नावाचा, उत्पादनाचा वापर करताना उत्पादकांना भिवापूर मिर्ची उत्पादक समूह गटाची परवानगी अथवा मान्यता घ्यावी लागेल.

विक्रीसाठी खास प्रयत्न
स्थानिक महिला बचत गटांना भिवापुरी मिर्चीचे पावडर तयार करून त्याच ब्रॅँडने विकता यावे यासाठी जिल्हा ग्रामीण विकास योजना एजन्सीने बचत गटांना आवश्यक यंत्रसामग्री पुरविण्याची योजना आखली आहे.