आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात साकारतेय सर्वांत उंच शासकीय इमारत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील सर्वांत उंच आणि प्रशस्त शासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, तब्बल एक लाख 68 हजार 394 वर्ग फुटांच्या इमारतीचे बांधकाम होत आहे. या इमारतीत तळमजल्यासह सहा माळे असून, यात तीस न्यायालयांचे कामकाज चालणार आहे. इतकी सुसज्ज आणि प्रशस्त असणारी ही शहर व जिल्ह्यातील पहिलीच शासकीय इमारत ठरणार आहे.
जिल्हा न्यायालयाच्या या इमारतीचे बांधकाम ऑगस्ट 2012 मध्ये सुरू झाले असून, पाच माळ्यांचे बांधकाम सध्या पूर्ण झाले आहे. पहिल्या ते पाचव्या माळ्यावर प्रत्येकी 32 हजार 183 वर्ग फुटांचे बांधकाम, तर सहाव्या माळ्यावर 11 हजार 190 वर्ग फुटांचे बांधकाम राहणार आहे. प्रत्येक माळ्यावर न्यायालय राहणार आहे. प्रत्येक न्यायालय 28 बाय 40 फूट क्षेत्रफळाचे राहील. न्यायालयाच्या इमारतीचे एकूण बांधकाम एक लाख 68 हजार 394 वर्ग फुटांचे आहे. यासाठी तब्बल 33 कोटी रुपये खर्च होणार आहेत. इमारतीची लांबी 240 फूट, रुंदी 160 फूट आणि उंची 90 फूट आहे. डोळे दीपवणारी ही इमारत शहराचे आकर्षण ठरणार आहे. विशेष असे, की इमारतीत प्रवेश करण्यासाठी प्रारंभी असलेल्या पायर्‍या या आपण अनेक चित्रपटांत पाहलेल्या दृश्याप्रमाणे भव्य आहेत. या पायर्‍यांची लांबी 63 फूट, रुंदी 33 फूट आणि उंची 23 फूट आहे. इमारतीला एकूण चार प्रवेशद्वार राहतील. त्यांपैकी दोन प्रवेशद्वार हे केवळ न्यायाशीशांसाठी, तर उर्वरित दोन सर्वसामान्यांसाठी आहेत; तसेच इमारतीला चार लिफ्ट आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिनेसुद्धा आहेत. या इमारतीचे डिझाइन मुंबईच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी केले आहे. इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (निर्माण) करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
दररोज राबतात दोनशे कामगार : अशा स्वप्नवत इमारतीच्या कामासाठी दरदिवशी किमान दोनशे कामगार मागील दोन वर्षांपासून सतत कार्यरत आहेत. कामाची गती चांगली सुरू आहे. सध्या पाच माळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. आणखी दीड वर्ष इमारत पूर्ण करण्यासाठी लागणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोणत्या माळ्यावर काय असणार?
> तळमजला : तळमजल्यावर कार पार्किंग आहे. या ठिकाणी तीस न्यायाधीशांच्या तीस कार पार्क करण्याची व्यवस्था आहे.
> पहिला माळा : चार न्यायालये, त्याच न्यायालयांचे कार्यालय, मुद्देमाल खोली, स्टेशनरी कक्ष, उपाहारगृह, के्रडिट कॉ. ऑप. सोसायटी आणि स्वच्छतागृह.
> दुसरा माळा : चार न्यायालये, त्याच न्यायालयांचे कार्यालय, सरकारी वकिलांचे कार्यालय, बार कार्यालय, वाचनालय, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बार रूम आणि स्वच्छतागृह.
> तिसरा माळा : सहा न्यायालये, त्याच न्यायालयांचे कार्यालय, पुरुष तसेच महिलांसाठी बंदीगृह, स्टोअर रूम आणि स्वच्छतागृह.
> चौथा माळा :
आठ न्यायालये, त्याच न्यायालयांचे कार्यालय, मुद्देमाल खोली आणि स्वच्छतागृह.
> पाचवा माळा : आठ न्यायालये, त्याच न्यायालयांचे कार्यालय, मुद्देमाल खोली आणि स्वच्छतागृह.
> सहावा माळा: कॉन्फरन्स हॉल, वाचनालय, न्यायाधीशांचा स्वतंत्र बैठक कक्ष, भोजनगृह.
सुरक्षेसाठी विशेष उपाय
प्रशस्त इमारतीला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन मुख्य प्रवेशद्वार ठेवण्यात आले; तसेच संपूर्ण इमारतीत अग्निशमनाची स्वतंत्र व्यवस्था आहे. लाखो लिटर पाण्याची क्षमता असलेली स्वतंत्र टाकी अग्निशमनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे; तसेच प्रत्येक माळ्यावर अग्निशमनासाठी व्यवस्था केली आहे.
वेगाने होतेय काम
ऑगस्ट 2012 पासून न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. वेगाने हे काम सुरू आहे. सध्या पाच माळ्यांचे काम झाले असून, जवळपास 60 टक्केकाम पूर्णत्वास आले. एकूण एक लाख 68 हजार 394 वर्ग फुटांची ही इमारत आहे. तळमजल्यासह सहा माळे आहेत. 2015 च्या अखेरपर्यंत इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पार्किंगचा विचारसुद्धा करण्यात आला आहे.
विनोद औतकर, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (निर्माण)