आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 जागा ही मोदींची पक्षांतर्गत कसोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नरेंद्र मोदींचा वारू सध्या जोरात असला तरी त्याला लगाम लावण्यास पक्षातील नेतेही सज्ज आहेत, असे भाजपतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ‘पंतप्रधान पदावर दावा सांगण्याआधी मोदींना पक्षांतर्गत परीक्षेला तोंड द्यावे लागेल. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 200 च्या वर जागा मिळवल्या तर त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उरणार नाही, पण 200 हून कमी जागा मिळाल्या तर त्यांची पुढील भूमिका काय राहील, या प्रश्नाचे उत्तर मोदींना सर्व प्रमुख नेत्यांसमोर निवडणुकीआधी द्यावे लागेल,’ असे पक्षाच्या सर्वोच्च अशा संसदीय मंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

मोदींची लोकप्रियता भाजपचे नेते नाकारत नाहीत. मात्र गुजरातमध्ये त्यांना जसे घवघवीत यश मिळाले तसे सर्वत्र मिळेल याची खात्री भाजपमधील मोदी सर्मथक नेत्यांनाही नाही. ‘गुजरात म्हणजे देश नव्हे. प्रत्येक राज्यातील राजकारण वेगळे आहे. यामुळेच मोदींना आताच प्रोजेक्ट करणे आत्मघातकी ठरेल, असे आमचे स्पष्ट मत होते व ते पक्षात मांडण्यातही आले,’ असे हा नेता म्हणाला.

दोनशे जागांचे लक्ष्य गाठता आले नाही तर काय करणार, या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीआधीच का हवे, हे स्पष्ट करताना संसदीय मंडळातील हा नेता म्हणाला की, ‘मोदी हे दिलेल्या शब्दावर कायम राहणारे नेते नाहीत. त्यांच्याबाबतचा हा अनुभव अनेक प्रकरणांमध्ये पक्षाच्या अनेक नेत्यांना वारंवार आलेला आहे. अडवाणींचा मोदी विरोध कदाचित अशाच अनुभवांमुळे असेल. शब्दाला जागण्याची त्यांची वृत्ती नसल्यामुळेच 200 हून कमी जागा मिळाल्यास काय करणार, या प्रश्नावर सर्व प्रमुख नेत्यांच्या साक्षीने मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी आणि त्या भूमिकेवर निवडणूक निकालानंतही ठाम राहावयास हवे.’

मोदींची पुढची वाट किती बिकट आहे याची कल्पना संसदीय मंडळातील या नेत्याच्या वक्तव्यावरून येईल. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावाखाली पक्षातील काही नेत्यांनी मोदींची नेमणूक मान्य करून घेतली असली तरी मोदींना कचाट्यात पकडण्याची एकही संधी पक्षातील त्यांचे विरोधक सोडणार नाहीत हे संसदीय मंडळातील नेत्याच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.