आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा नवा फॉर्म्युला ‘पेज वन’, एका कार्यकर्त्याकडे 60 मतदारांची जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने आता नवा फॉर्म्यूला आणण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकाही अमित शहा फॉर्म्युल्यानुसारच लढण्याचे भाजपमध्ये अगोदरच निश्चित झाले आहे. भाजपच्या जिल्हा पातळीवर होणा-या सर्व बैठकांमधून शहा यांच्या फॉर्म्युल्याचाच ऊहापोह सुरू आहे.
भाजपच्या अमरावती जिल्ह्यातील झालेल्या एका खास बैठकीत निवडणुका लढण्याबाबतची आणखी एक नवी रणनीती पक्षाचे संघटनमंत्री रामदास आंबटकर यांनी निवडक पदाधिका-यांना सांगितली. या नव्या रणनीतीबाबत ‘दिव्य मराठी’ने आंबटकर यांना विचारले असता त्यांनी त्याची पुष्टी केली. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे प्रत्येकी 15 परिवारांची जबाबदारी देण्यात येणार आहे.

काय आहे पेज वन?
भाजपने या फॉर्म्युल्याला ‘पेज वन’, असे संबोधले आहे. यानुसार विधानसभेच्या मतदारसंघनिहाय असलेल्या मतदार यादीवरील प्रत्येक पानासाठी एका कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात येणार आहे. मतदार यादीतील एका पानावर असलेल्या 60 मतदारांशी (साधारणत: 15 परिवार) हा भाजप कार्यकर्ता संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान संपर्क साधणार आहे. निवडणुकीची अद्ययावत माहिती देणे, मतदारसंघातील घडामोडी सांगणे, विधानसभेतील उमेदवारांची माहिती देणे, मतदान केंद्रांची माहिती देणे आणि हे 60 मतदार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांपर्यंत जाऊन मतदान करतील याची पुरेपूर दक्षता घेणे, अशी जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकण्यात येणार आहे. यामुळे अधिकाअधिक मतदान होऊन आणि भाजप कार्यकर्ता सतत संपर्कात राहिल्याने पक्षाचा फायदा होईल.