आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती - लोकसभा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा की नाही, या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण तोगडिया व अध्यक्ष अशोक सिंघल या प्रमुख नेत्यांमध्ये बुधवारी रात्री अमरावतीत गोपनीय बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोण्याही एका नेत्याच्या नावाचा आग्रह झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमरावतीत चार दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. तोगडिया, सिंघल यांच्यासह बुधवारी राजनाथसिंह यांनीही बैठकीत हजेरी लावली. या बैठकीत कोणत्याही राजकीय विषयावर मंथन होणार नसल्याचे सर्वच नेत्यांनी सांगितले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच राजकीय क्षेत्र या बैठकीकडे पाहत आहे.
राजनाथ यांनी बुधवारी संघाच्या प्रांत प्रचारकांशी संवाद साधून त्यांच्याकडून देशभरात लोकांमध्ये भाजपविषयी असलेल्या भावनांची माहिती घेतली. तसेच जनतेच्या आपल्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत, याबाबतही माहिती करून घेतली.
सध्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. मात्र, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह रालोआतील काही मित्रपक्षांचा त्यांच्या नावाला विरोध आहे. यातूनच बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे नेते नितीशकुमार यांनी रालोआला सोडचिठ्ठी दिली. या प्रकारामुळे जागे झालेल्या भाजपने आता मोदींचे नाव निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यापूर्वी सर्वच मित्रपक्ष व संघाच्या नेत्यांचे मत आजमावणे सुरू केले आहे. संघाच्या बैठकीच्या निमित्ताने अमरावतीत दाखल झालेले सरसंघचालक भागवत, राजनाथ, तोगडिया व सिंघल या चार प्रमुख नेत्यांमध्ये बुधवारी रात्री याच विषयावर गोपनीय बैठक झाल्याचेही वृत्त आहे. या बैठकीत कोणाचे नाव जाहीर करायचे यापेक्षा निवडणुकीपूर्वी नाव जाहीर करायचे की नाही? याच विषयावर खल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी सकाळी राजनाथ नवी दिल्लीकडे रवाना झाले.
नरेंद्र मोदी शनिवारी साधणार संवाद
भाजप अध्यक्षांसोबत राजकीय चर्चा झाल्यानंतर आता 11 ते 13 जुलै दरम्यान संघाची नियमित बैठक सुरू झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी या बैठकीत सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. संघाचे देशभरातील प्रांतप्रचारक एकाच ठिकाणी भेटणार नसल्याने राजनाथ यांच्या पाठोपाठ मोदीही त्यांच्याशी चर्चा करून पक्षाबाबत लोकभावना जाणून घेणार असल्याचे कळते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.