आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपपुढे सक्षम उमेदवार शोधण्याचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आदिवासीबहुल मेळघाट मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधण्याचे तगडे आव्हान भाजपासमोर उभे ठाकले आहे, तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार केवलराम काळे हेच उमेदवार असतील. या मतदारसंघात काँग्रेसविरुद्ध भाजप, अशी परंपरागत लढत होते. त्यामुळे, अपक्ष अथवा इतर पक्षांना येथे फारसा वाव नसल्याचेच आतापर्यंतच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून हा मतदारसंघ अस्तित्वात आहे. 1962 मध्ये मेळघाट मतदारसंघात आरक्षण नव्हते. मात्र, 1967 पासून अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता हा मतदारसंघ राखीव करण्यात आला. तेव्हापासून 1990 पर्यंत मेळघाटातून काँग्रेस उमेदवारच विजयी झाले आहेत. 1995 मध्ये भाजपचे पटल्या गुरुजी (मावस्कर) यांनी काँग्रेसची ही विजयी परंपरा मोडित काढली होती. तेव्हापासून भाजपने येथून सलग तीन विजय मिळवले आहेत. 2009 मध्ये भाजपच्या राजकुमार पटेल यांचा केवळ 703 मतांनी पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात काम केल्याचा ठपका ठेवून भाजपने राजकुमार पटेल यांना पक्षातून काढून टाकले. त्यामुळे सध्या भाजपकडे उमेदवारच नाही.

सक्षम उमेदवार निवडीसाठी उठाठेव : भाजपच्या राजकुमार पटेल यांनी मेळघाट मतदारसंघातून सलग दोनदा विजय मिळवला होता. मात्र, तिसर्‍यांदा ते अल्प मतांनी पराभूत झाले होते. मात्र, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे भाजपला येथे नवीन चेहरा शोधावा लागणार आहे. नंदू भिलावेकर, डॉ. रवि पटेल, प्रभुदास भिलावेकर आणि नागपूरला प्रशासकीय सेवेत उच्च पदावर असलेले रमेश मावस्कर यांच्या नावांवर सध्या पक्षात विचार सुरू आहे. मावस्कर हे मेळघाटातून निवडणूक लढवू शकतात, असे संकेत पक्षाने दिले आहेत. मात्र, त्यांना प्रशासकीय सेवेतील नोकरी सोडून ही निवडणूक लढवावी लागणार आहे. राजकुमार पटेल हे अपक्ष म्हणून निवडणूक आखाड्यात उतरणार आहेत.
मतदारसंघाची पार्श्वभूमी : 1962 पासून अस्तित्वात मेळघाट मतदारसंघात चिखलदरा, धारणी या दोन तालुक्यांतील 332 गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ अडचणीचा आहे. उंच डोंगर, सिपना, गडगा, तापी, खंडू, यांसारख्या सहा मोठ्या नद्या या मतदारसंघातून वाहतात. आदिवासीबहुल गावे दुर्गम गावात वसलेली असल्याने प्रचारादरम्यान अनेक समस्या उदभवतात.

आतापर्यंत निवडून आलेले आमदार
मामराज खंडेलवाल- अपक्ष
डी. एन. पटेल-काँग्रेस
रामू पटेल-काँग्रेस
नारायण पटेल-काँग्रेस
तु. रू. काळे-काँग्रेस
पटल्या गुरुजी मावस्कर -भाजप
राजकुमार पटेल-भाजप
केवलराम काळे-काँग्रेस