नागपूर - पाच कुख्यात कैद्यांनी पळ काढल्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अनेक सुरस कहाण्या दररोज उजेडात येत आहेत. मंगळवारी या तुरुंगातील तपासात ‘ब्ल्यू फिल्म’ने भरलेले चार पेन ड्राइव्ह आणि नऊ
मोबाइल सापडले. या ठिकाणी सापडलेल्या मोबाइलची संख्या आता ५० वर गेली आहे. येथील कैद्यांना ‘ब्ल्यू फिल्म’ने भरलेल्या मोबाइलचाही पुरवठा होत असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते.
कारागृहातील कैद्यांकडे असलेले मोबाइल, शस्त्रे आणि मादक पदार्थ शोधण्यासाठी विशेष चौकशी समितीचे प्रमुख आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही दोन्ही पथके कारागृहात झाडाझडती घेत आहेत. मंगळवारी राबवण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत पथकाला एकूण मोबाइल आणि चार चाकू सापडले आहेत. कारागृहात बंदूकही असल्याचा संशय पोलिसांना आहे. मागील सहा दिवसांमध्ये एकूण ५६ मोबाइल, चार पेन ड्राइव्ह, जवळपास तेवढ्याच बॅटरी, चार्जर, पंधरावर चाकू आणि किलोभर गांजा आठ चिलमी सापडल्या आहेत.
दरम्यान, नागपूर कारागृहाचे प्रभारी अधीक्षक भाईदास ढोले हे त्यांच्या जळगाव येथे बदलून गेले आहेत. त्यामुळे चंद्रपूर कारागृहाचे अधीक्षक गणेश महल्ले यांच्याकडे नागपूरचा प्रभार सोपवला आहे.
बाइकवरून पळाले कैदी
कैद्यांनापळण्यात मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून हे संशयित कैद्यांशी मोबाइलवर संपर्कात होते. ३१ मार्चच्या रात्री पाच कैदी तुरुंगातून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी दुचाकींनी त्यांना शहराबाहेर जाण्यास तसेच आर्थिक मदत केली. फरार कैद्यांचा ठावठिकाणा त्यांना माहिती आहे, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने करण्यात आला. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.