नागपूर - ‘राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढण्यात येणार असून, प्रामुख्याने राज्याने काढलेल्या कर्जाचा विनियोग कसा झाला, याचा शोध घेतला जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.मंत्रिमंडळातील समावेश होऊन अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर मुनगंटीवार सोमवारी प्रथमच नागपुरात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यावर असलेल्या हजारो कोटींच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला.
सातत्याने कर्ज काढल्यावर त्याचा विनयोग कशा पद्धतीने झाला, तो योग्य पद्धतीने झाला की नाही, याचा शोध घेतला जाईल. या संपूर्ण माहितीसह आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे ते म्हणाले. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा ही बहुसंख्य मतदारांची इच्छा आहे, एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा नसल्याचा दावा केला.