आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती - फोनवरून वारंवार प्रयत्न करूनही गॅस सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग होत नाही, अशी तक्रार असणार्या ग्राहकांना आता पूर्वीच्याच पद्धतीने बुकिंग करता येईल. जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी मंगळवारी याबाबत आदेश जारी केले.
गॅस सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग, सबसिडीची रक्कम मिळण्यासंदर्भात होत असलेला त्रास आणि इतर मुद्दय़ांसंबंधी भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. चर्चेअंती जिल्हाधिकार्यांनी हे आदेश जारी केलो. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र चांदूरकर, भारत पेट्रोलियमच्या एलपीजी सेल्स एक्झिक्यूटिव्ह प्रीती मिर्शीकोटकर, इतर तेल व नैसर्गिक वायू कंपन्यांचे अधिकारी, बँकांचे अधिकारी, ई-गव्हर्नन्सचे जिल्हा समन्वयक हसन कादरी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आपापल्या विभागांची माहिती देत नागरिकांना सहकार्य करण्याचे मान्य केले.
तत्पूर्वी, भाजपचे महानगर अध्यक्ष तुषार भारतीय यांनी आक्रमकपणे त्रस्त नागरिकांची बाजू मांडली. वारंवार फोन करूनही बुकिंग न होणे, बुकिंगसाठी असलेली मोबाइलची अनिवार्यता, अनुदानाची रक्कम बँकेत जमा होताना घोळ, एकाची रक्कम दुसर्याच्या नावावर जमा होणे, एसएमएसद्वारे रक्कम जमा झाल्याचा संदेश आल्यावरही प्रत्यक्षात ती खात्यात वळती झालेली नसणे आदी समस्या या वेळी प्रामुख्याने मांडण्यात आल्या.
जीवनावश्यक वस्तूंच्या र्शेणीत मोडणार्या सिलिंडरबाबतच्या अनेक तक्रारीही त्यांनी पोटतिडकीने मांडल्या. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी किरण पातूरकर, महानगर सरचिटणीस प्रशांत शेगोकार, चेतन गावंडे व मुन्ना सेवक, मनपातील गटनेते संजय अग्रवाल, महिला आघाडीच्या सुरेखा लुंगारे व राधा कुरील, इतर पदाधिकारी सुनील साहू, अजय सारस्कर, राजेंद्र हजारे, अनिल आसलकर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.
तत्काळ अंमलबजावणी
नियमित आढाव्याचा भाग म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बँक खाते व सिलिंडरच्या नोंदणीशी ‘आधार’ची जोडणी या विषयावर सभा बोलावण्यात आली होती. ती आटोपल्यानंतर त्याच कक्षात जिल्हाधिकार्यांनी भाजपच्या प्रतिनिधी मंडळाशी बोलणी केली. त्यामुळे आदेशाच्या अंमलबजावणीचा मार्गही सुकर झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.