आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमार्थचा जाधवला जबर पंच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिलहास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेंतर्गत झालेल्या 28 ते 30 किलो वजन गटात न्यू आॅरेंजसिटी हायस्कूल, वरुडच्या सेलिवन परमार्थने मन्नालाल गुप्ता महाविद्यालयाच्या तनय जाधवचा जबर पंच हाणून रिंगबाहेर करीत 14 वर्षांखालील ग्रामीण मुलांच्या गटात सुवर्णपदक पटकावले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे, जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या सहकार्याने शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात असलेलया बॉक्सिंग रिंगवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 14 वर्षांखालील ग्रामीण गटात न्यू आॅरेंजसिटी हायस्कूल, वरूड आणि मन्नालाल गुप्ता महाविद्यालयाचा दबदबा राहिला.

मुलांच्या 44 ते 46 किलो वजन गटात पन्नालाल गुप्ता महाविद्यालयाच्या नीतेश चेटुलेने न्यू आॅरेंजसिटी हायस्कूल, वरुडच्या शिवम खंडेलवालला गुणांच्या आधारे लोळवून जेतेपद पटकावले. 42 ते 44 किलो वजन गटात भुपेश कोल्हेे सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. भुपेशने आदेशच्या चेहऱ्यावर ठोशांची बरसात करून त्याला चांगलेच जेरिस आणले. अशात एका जबर प्रहारामुळे आदेशचे अवसान गळाल्याचे लक्षात येताच पंचांनी भुपेशल विजयी घोषित केले. 32 ते 34 किलो गटात राहुल राठोडपुढे प्रतिस्पर्ध्यांचे काहीएक चालले नाही. तर 34 ते 36 किलो वजन गटात तेजस बेलसरेने सहज विजय मिळवला. 38 ते 40 किलो गटात उज्जल तायडेची गुणांच्या आधारे सरशी झाली. 40 ते 42 किलो वजन गटात कार्तिकेय व्यासपुढे अन्य कोणत्याही बॉक्सरचा निभाव लागला नाही. 46 ते 48 किलो गटात प्रद्युम्न कांडलकरने सहज लढत जिंकून अव्वल स्थान पटकावले. या स्पर्धेत दिनेश बावनथडे यांनी मुख्य पंच म्हणून काम बघितले. सविता बावनथळे या जिलहा बॉक्सिंग संघटनेच्या सचिव आणि स्पर्धेच्या तांत्रिक अधिकारी होत्या. झफर खान आणि एम. शम्मी यांनीही सहायक पंच म्हणून कामगिरी बजावली. या स्पधेर्त चांगलीच रंगत आली असून श्रेष्ठ प्रदर्शनासाठी प्रत्येकजण कसब दाखवत आहे.

प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडण्याचा खेळ
बॉक्सिंग या खेळात सरळ प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडावे लागते. जो खेळाडू चेहऱ्यावर प्रहार करेल, त्यालाच या खेळात यश मिळते. पोट आणि चेहऱ्यावरच प्रहार करायचे असतात. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या खेळाडूला तत्काळ रिंगबाहेर केले जाते. प्रतिस्पर्ध्याच्या गालावर जबर पंच बसला तर ठोसा हाणणाल्यास विजय झालाच म्हणून समजा. कारण ज्याला पंच बसतो त्याच्या डोळ्यापुढे काजवेच चमकायला लागतात. त्यामुळे या खेळात बचावही मजबूत असणे गरजेचे आहे. गालावर पंच बसू नये म्हणून बॉक्सर नेहमी दोन्ही हात दोन गालांच्या पुढे धरून त्यांचे रक्षण करताना दिसतो.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंग
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात नुकतेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिंग रिंग बसवण्यात आले असून राज्यात अशाप्रकारचे रिंग याआधी मुंबई व पुणे येथेच होते. विदर्भात अमरावती येथे सर्वप्रथम बॉक्सिंग रिंग बसवण्यात आले असून या 6.5 लाख रुपयाच्या रिंगवर प्रथमच जिल्हा शालेय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली. हे रिंग आवश्यकतेनुसार कुठेही हलविता येते. नट बोल्टद्वारे ते बसविण्यात आले आहे. या रिंगवर सर्व आधुनिक सोयी आहेत.