आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bricks Production Project From Bamboo Ash In Gadchiroli

गडचिरोलीत बांबूच्या राखेपासून वीट निर्मिती प्रकल्प, वन विभागाच्या पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - वन विभागाच्या पुढाकाराने नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पाच ठिकाणी बांबूच्या राखेपासून वीट निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले असून, यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांसाठी आष्टी पेपर मिलतर्फे विनामूल्य राखेचा पुरवठा करण्यात येतो.
चामोर्शी, मार्कंडा, एटापल्ली, सिरोंचा व कुरखेडा येथे बांबूच्या राखेपासून पर्यावरणपूरक वीट निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले असून, यात 75 जणांना रोजगार मिळाला आहे. चामोर्शी येथील प्रकल्पासाठी वन विभागाने 12 लाख रुपयांच्या दोन मशीन विकत घेतल्या असून, त्यात 15 मजूर कार्यरत आहेत. त्यांना 250 रुपये प्रतिदिन रोजगार दिला जातो. वन विभागाच्या जागेत सुरू असलेला हा प्रकल्प जयनगर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला देण्यात आला आहे.
असा येतो खर्च
एका महिन्याला दहा ट्रक राख 20 हजार, एक टन चुना चार हजार, दहा ट्रक रेती दहा हजार, सिमेंटच्या 100 बॅग्ज 35 हजार, वीज बिल तीन हजार, 15 मजुरांची 250 रुपयांप्रमाणे महिन्याची मजुरी एक लाख 12 हजार 500 रुपये असा एकूण एक लाख 87 हजार 500 रुपये खर्च येतो. विटा आणि टाइल्सच्या विक्रीतून दोन लाख 70 हजार उत्पन्न होते. त्यातून खर्च वजा जाता 80 ते 85 हजार नफा होतो. हा नफा मजुरांना बोनस म्हणून वाटण्याचा वन विभागाचा मानस आहे. तीन महिन्यांत दोन लाख विटांची निर्मिती झाली. गडचिरोलीची गरज 25 लाख विटांची आहे.