आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालय परिसरातच आरोपीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - देशी कट्टा व मॅगझिन बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला न्यायालयात नेत असताना अचानक चक्कर आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मलकापूर न्यायालय परिसरात घडली. घटनेनंतर रुग्णालय परिसरात गर्दी जमल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.

बुधवारी दुपारी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर शहरातील गंगासिंग झ्यामसिंग राजपूत (३५) व नटवरसिंग राजपूत (२७) या दोघा भावांना गावठी कट्टा मॅगझिनसह बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. गुरुवारी दोघांना पोलिसांनी न्यायालयात आणले होते. दरम्यान, अचानक चक्कर आल्यामुळे गंगासिंग झ्यामसिंग राजपूत खाली कोसळला व मरण पावला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेले. याची माहिती आरोपीच्या नातेवाइकांना कळताच मोठ्या प्रमाणात रुग्णालय परिसरात गर्दी झाली. पोलिसांच्या हाणामारीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते. या वेळी मलकापूर शहर पोलिसांनी सतर्कता म्हणून दंगाकाबू पथकासह मोठी कुमक रुग्णालय परिसरात बंदोबस्तासाठी लावली होती.
याप्रकरणी मृतकाच्या पंचनाम्याकरिता उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, तहसीलदार रवींद्र जोगी यांना पाचारण करण्यात आले होते.