आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत उपोषणकर्त्या आरोग्य सेविकेचा गर्भपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - स्त्री भ्रूणहत्येबाबत राज्यभर जनजागृती करत फिरत असलेल्या खासदार सुप्रिया सुळे गडचिरोलीत असताना येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या एका आरोग्य सेविकेचा गर्भपात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गडचिरोलीत मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये विशेष म्हणजे ही बाब खासदार सुळे आणि आर. आर. पाटील यांना कळल्यानंतर त्यांनी या महिलेची साधी भेट घेण्याची तसदी घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेने नुकत्याच केलेल्या आरोग्य सेविकांच्या पदभरतीत बंधपत्रित आरोग्य सेविकांना डावल्याच्या निषेधार्थ 10 आरोग्यसेविकांनी 27 जूनपासून जिल्हा परिषदेपुढे आंदोलन सुरू केले होते. यामध्ये किरण रघुवंशी, अनिता तिवडे, योगिता सोमनानी, रेणू कोलवार आणि इतर आरोग्यसेविकांचा समावेश होता. यामध्ये रेणू कोलवार या गर्भवती होत्या.
सततच्या उपोषणामुळे कोलवार यांचा गर्भपात झाला; परंतु डॉक्टर व जिल्हा प्रशासनाने कोलवार यांची दखल घेतली नाही. तसेच याचवेळी भ्रूणहत्येबाबत जनजागृती करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आर. आर. पाटील गडचिरोलीत होते. यानंतर पाटील यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते या महिलेची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, खा. सुळे या सायंकाळीच नागपूरकडे रवाना झाल्या. यामुळे आरोग्यसेविकांमध्ये प्रचंड संतापाची भावना होती. या घटनेची दखल न घेतल्याने स्त्री संघटनेच्या जिल्हाप्रमुख छायाताई कुंभारे यांनी त्यांचा निषेध केला आहे. दरम्यान, शुक्रवारी सुळे या शहरात राष्ट्रवादी युवती कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या मेळाव्याला चांगली गर्दी जमली होती. मात्र, या घटनेनंतर मेळाव्यात सहभागी महिलांनी देखील याबाबत निषेध व्यक्त केला आहे.