आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Registers Two Fresh Cases In Coal Block Allocation Scam

कोलगेट प्रकरणी नागपुरातील कंपनीवर सीबीआय पथकाचे छापे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - वीज प्रकल्प उभारण्याच्या नावावर कोळसा खाण पदरात पाडून त्यातील कोळसा चक्क बाजारात विकणार्‍या सेंट्रल कॉलरीज कंपनी लिमिटेड नागपुरातील संचालकांच्या प्रतिष्ठानांवर सीबीआयने गुरुवारी छापे घालून झडत्या घेतल्या.
नागपुरातील उद्योजक गोविंद डागा हे या कंपनीचे संचालक आहेत. कंपनीने दहा वर्षांपूर्वी वीज प्रकल्प उभारण्याच्या नावावर केंद्र सरकारच्या योजनेतून कॅप्टिव्ह कोळसा खाण मिळवली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील खाणीतून कंपनीने काही प्रमाणात कोळशाचे उत्खनन करून कोळसा खुल्या बाजारात विकल्याची तक्रार होती. वास्तविक खाणीतील कोळसा नियोजित प्रकल्पावर वापरण्याच्या अटींवरच कंपनीला खाण उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे कोळसा मंत्रालयाने खाणीची लीज रद्द केली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. गुरुवारी सीबीआयने यासंदर्भात अफरातफरीचे प्रकरण दाखल केल्यावर पथकांनी कंपनीच्या नागपुरातील प्रतिष्ठांनावर छापे घातले. त्यात सिव्हिल लाइन्स परिसरातील डागा हाऊस आणि कंपनीच्या कार्यालयाचा प्रामुख्याने समावेश असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईसाठी सीबीआयचे दिल्लीचे खास पथक बुधवारपासून नागपुरात खास तळ ठोकून होते. कारवाईतील पथकाकडून प्रचंड गुप्तता बाळगली जात होती.

स्थानिक अधिकार्‍यांना या कारवाईपासून दूर ठेवण्यात आल्याने छाप्यांमध्ये नेमके काय निष्पन्न झाले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, पथकांनी कंपनीच्या कार्यालयातील दस्तऐेवज तसेच संगणकाच्या हार्ड डिस्क ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशभर गाजत असलेल्या कोलगेट घोटाळ्यात नागपुरातील अनेक लाभार्थींवर यापूर्वी सीबीआयने छापे घातले आहेत.