आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chavan Lays Foundation Stone For Infosys' Campus At Mihan

इन्फोसिसचे आगमन ही सकारात्मक नांदी - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - जागतिक स्तरावरील आर्थिक मंदीच्या वातावरणामुळे मिहान प्रकल्पाच्या प्रगतीला खीळ बसली होती. इन्फोसिसचे नागपुरातील आगमन ही सकारात्मक वातावरणाची नांदी ठरणार असून, आता खर्‍या अर्थाने मिहान प्रकल्पाच्या प्रगतीला चालना मिळणार आहे, अशी आशा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मिहान प्रकल्पातील भव्यदिव्य अशा कॅम्पसचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी इन्फोसिसचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष एन.आर. नारायण मूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबई, पुणे आणि बंगळुरू या मोठय़ा शहरांमध्ये प्रकल्प उभारणीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागपूरसारख्या दुसर्‍या र्शेणीतील महत्त्वाच्या शहरांकडे उद्योगांचे लक्ष वेधले जात आहे. इन्फोसिसच्या आगमनामुळे इतरही कंपन्या आता नागपुरात आकृष्ट होणार आहेत. टीसीएसने नागपुरातील प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे, तर बोइंगच्या एमआरओ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात लक्ष वेधले.
इन्फोसिसला प्रकल्प उभारणीसाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
असा राहणार आधुनिक कॅम्पस : मिहान प्रकल्पात इन्फोसिसने 142 एकर जागा घेतली आहे. कॅम्पसच्या पहिल्या टप्प्याच्या उभारणीसाठी कंपनीने 475 कोटींची गुंतवणूक केली आहे. यात 9.5 लाख चौरस फुटांचे प्रत्यक्ष बांधकाम असेल व या परिसरात सुमारे पाच हजार सॉफ्टवेअर व्यावसायिक काम करू शकतील. बांधकाम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कुठलाही एसी न वापरता आतील वातावरण थंड राहण्यासाठी खास रेडियंट कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
कार्यक्रम इन्फोसिसचा की काँग्रेसचा : इन्फोसिसच्या या समारंभात काँग्रेस नेत्यांनीच मोठी गर्दी केली होती. माजी मंत्री अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी या नेत्यांची मंचावर पहिल्या रांगेतील उपस्थिती सर्वांनाच खटकत होती मुख्यमंत्री - नारायण मूर्ती यांच्या पत्रपरिषदेतही त्यांचीच वर्दळ दिसल्याने कार्यक्रम इन्फोसिसचा की काँग्रेसचा, असा संभ्रम निर्माण झाला होता.

भरीस भर म्हणून मुख्यमंत्र्यांनी या समारंभात देशातील लोक आर्थिक प्रगतीसाठी आम्हाला मतदान करतील, असे वक्तव्य करून प्रचारास हातभार लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
छायाचित्र - कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांसमक्ष विदर्भवाद्यांनी माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करत वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या.