आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Fadanvis In Relex, But Many Police Men Not Ate On Sunday Night

मुख्यमंत्री तुपाशी, पोलिस कर्मचारी उपाशी; 60 पोलिसांनी रात्र काढली उपाशीपाेटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी हिंगणघाटवरून आलेल्या एका पोलिस शिपायाचा नागपुरातील थंडीत कुडकुडत जीव गेल्याची घटना ताजी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावरील सुरक्षा यंत्रणेचे उपाशीपोटी हाल सुरू असल्याचे समोर आले आहे. सध्या ६० पोलिस सुरक्षेसाठी तैनात आहेत. रविवारी रात्री त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली. दुसरीकडे मुखमंत्री व मंत्र्यांसाठी मात्र शासकीय निवासस्थानी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाच झाली नसल्याने त्यांची दया येऊन एका पोलिस अधिका-याने पाचशे रुपये देऊन समोसे आणण्याची व्यवस्था केली, पण ६० जणांना एवढे समोसे पुरणार कसे? शेवटी पोलिस मुख्यालयातून जेवण मागवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. सतत फोन करूनही केवळ डाळ-भात एवढेच जेवण पाठवण्यात आले.तेही तीन-चार जणांना पुरेल एवढेच होते. डाळच शिल्लक राहिली नसल्याने उरलेला भात कशाबरोबर खाणार, असा प्रश्न उभा राहिला. शेवटी एका समोशावर सर्व पोलिसांनी रविवारची रात्र काढली.

रामगिरी बंगल्यावरील पोलिस अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, जेवणाची पुरेशी व्यवस्था पोलिस मुख्यालयाने केली पाहिजे, तर मुख्यालयाच्या म्हणण्यानुसार पोलिसांची एकूण संख्या आणि त्यांना किती जेवण लागेल, हे सकाळीच कळवले गेले पाहिजे. पोलिसांमधील समन्वयाच्या अभावामुळे शिपायांना मात्र सक्तीचा उपास करावा लागला. बाहेर थंडी आणि त्यात उपाशीपोटी अशा स्थितीत पोलिसांच्या प्रकृतीवर परिणाम झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सोमवारी काही वृत्तवाहिन्यांनी हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने तातडीने ‘रामगिरी’वरील पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.