आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री लोणीकरांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री; पवार, शिंदे, ज्योती कलानी यांच्या प्रश्नांवर निरुत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - एखादा आमदार जेव्हा मंत्री होतो तेव्हा त्याची क्षमता पाहूनच त्याला मंत्रिपद दिले जाते. मंत्री असल्याने सभागृहातील सदस्यांच्या प्रश्नाला तो सहज टोलवेल अशी अपेक्षा असते. परंतु बबनराव लोणीकर यांना आपल्या विभागाच्या प्रश्नाचेच उत्तर देता आले नाही तेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनाच पुढाकार घेऊन सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे तिस-यांदा सभागृहात आले आहेत. १९९९ आणि २००४ मध्ये ते जिंकले होते, परंतु २००९ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदा मोदी लाटेत त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी मिळवली. तिसरी टर्म असल्यामुळेच त्यांना मंत्रिपद देण्यात आले. परंतु प्रश्नोत्तराच्या काळात जेव्हा त्यांच्या विभागाशी संबंधित प्रश्न आमदारांनी विचारले तेव्हा त्यांना उत्तरच देता आले नाही आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मैदानात उतरावे लागले आणि त्यांनी उत्तरे देऊन बबनराव लोणीकर यांची सुटका केली.
नवीन आमदार प्रथमच सभागृहात येत असल्याने त्यांना सभागृहातील कामकाजाची माहिती नसेल तर ते समजू शकतो. परंतु सभागृहात दहा वर्षे घालवलेल्या आमदारालाही कामकाजाची माहिती नसल्यास कशी फजिती होते ते मंगळवारी लोणीकरांच्या निमित्ताने विधानसभेत दिसून आले.

परतूरचे आमदार आणि भाजपचे माजी जालना जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता खाते दिले. मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासाला रूपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील पाणी कपातीबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. अजित पवार, प्रणिती शिंदे, ज्योती कलानी, किसन कथोरे, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले, परंतु बबनराव लोणीकर यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. पवार यांनी तर पाणी कपात कशाच्या आधारावर केली, असा प्रश्न केला तेव्हा लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना चांगली गुगली टाकल्याचे म्हणत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि बबनराव लोणीकर फक्त पाहत राहिले. विभागाच्या मंत्र्याकडे जी माहिती नव्हती ती माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सादर केली. त्या वेळी सर्व अवाक् झाले.

अनुत्तरीत राहाण्याची दुसरी वेळ
गेल्या आठवड्यातही प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना झालेल्या गोंधळामुळे बबनराव लोणीकर विरोधकांच्या हातातून बचावले होते. त्यांच्या खात्यासंदर्भातील नांदेड व लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई विषयीचा प्रश्न शिवसेना आमदार विजय औटी यांनी उपस्थित केला होता. सदस्यांनी सभागृहात प्रश्न पुकारल्यावर मंत्री छापल्याप्रमाणे असे उत्तर देतात. त्यानंतर उपप्रश्नांना सुरवात होते. मात्र, मंत्रीमंडळात नव्याने समावेश झालेल्या लोणीकरांना ही उत्तरे देणे जमले नाही. त्यांच्या बाजूला बसलेल्या अनुभवी आणि सहकारी मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना मार्गदर्शन करत आमदारांसोबत बैठक घेण्याचा सल्ला दिला. तो पाळत लोणीकरांनी तसे उत्तर दिले अन् लोणीकर बचावले होते.