आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Take Constractive Decision In First Session

मुख्यमंत्र्यांनी केली विराेधकांची ‘बाेलती बंद’, पहिल्याच अधिवेशनात सकारात्मक निर्णयांचा धडाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सकारात्मक निर्णयांची झलक दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची बाेलतीच बंद केल्याचे नागपुरातील हिवाळी अधिवेशनात दिसून आले.

फडणवीस सरकारचे हे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन. ‘हाेमपिच’ नागपूरमध्ये हाेत असलेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या हे दोन मुद्दे घेऊन विरोधकांनी गदारोळ चालवला हाेता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चर्चेला तयारी दर्शवली आणि पहिल्याच आठवड्यात शेतक-यांच्या फायद्याचे निर्णय जाहीर करून विरोधकांची तोंडे बंद केली. वीज बिल माफी, कर्जावरील व्याजमाफी आणि सावकारी कर्ज भरण्याची तयारी दर्शवून सुमारे ३४ हजार कोटींच्या नव्या योजना प्रस्तावित केल्या. सात हजार कोटींचे वेगळे पॅकेज जाहीर केले. दुष्काळ ,सीमाप्रश्न, एलबीटी, वीज, मुंबई विकास, कामगार कायदे, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक यासारख्या अनेक मुद्द्यांवर राज्य सरकारच्या विचाराधीन असलेल्या निर्णयांची घाेषणा सभागृहात केली. विधानसभेत चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्द्यावर विरोधी बाकांवरून विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर देऊन विरोधकांचे समाधान करण्याचा यशस्वी प्रयत्नही मुख्यमंत्र्यांनी चालवला आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांकडे आता मुद्दे नसल्याचे दिसून येत आहे.

‘तुम्ही तर वडिलांचे मित्र’
माजी मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान पुनर्वसनाबाबतचा एक प्रश्न उपस्थित केला हाेता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कदम साहेब, तुम्ही तर माझ्या वडिलांचे मित्र. तुम्ही ज्या सूचना सुचवाल त्या सर्व सूचनांचे स्वागत आहे. राज्याच्या हिताच्या तुम्ही सुचवलेल्या सूचनांचा स्वीकार करू,’ असे भावनिक व प्रेमळ उत्तर देत मुख्यमंत्री विरोधकांची मने जिंकत असल्याचे दिसते.

विरोधकही ऐकतात शांतपणे
कोणत्याही चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षातील सदस्य शांतपणे मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे निवेदन ऐकून घेतात. उत्तरादरम्यान एखादा अपवाद वगळता कोणताही गदारोळ सभागृहात होतानाचे चित्र दिसले नाही. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील, वर्षा गायकवाड हे सर्वच माजी मंत्री सरकारकडून देण्यात येणारी उत्तरे अगदी लक्षपूर्वक ऐकतात.