आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..आणि 28 तासांनंतर भुसावळवरून मिळाला ‘शुभ’ संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- खेळायला घराबाहेर पडलेला पोटचा गोळा दुसरा दिवस उजाडला तरी घरी न परतल्याने त्याच्या सुखरूपतेची वार्ता ऐकण्यासाठी आतुर आई-वडिलांच्या कानावर तब्बल 28 तासांनंतर ‘शुभ’ वार्ता पडली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. बच्छराज प्लॉटमधून अचानक बेपत्ता झालेला 13 वर्षीय शुभ सुखरूप आहे, तो भुसावळला सापडल्याची बातमी नातेवाइकांना कळाली अन् पालकांपासून पोलिसांपर्यंत सार्‍यांनाच हायसे वाटले.

शुभ प्रमोद साहू असे त्या मुलाचे नाव आहे. शुभ हा मणिबाई गुजराथी हायस्कूलमध्ये आठव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जातो, असे त्याने आईला सांगितले. त्याने पायात चप्पलसुद्धा घातली नाही, सायकलशिवाय कधीही खेळायला न जाणारा शुभ शनिवारी सायकल न घेताच बाहेर पडला. जेवणसुद्धा केले नाही. बराच वेळ झाल्यानंतरही शुभ घरी परतला नाही. त्या वेळी त्याच्या आईने परिसरात शोधाशोध केली. मात्र, तो गवसला नाही. त्यांनी शुभच्या वडिलांना व कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण शहरा शोध घेतला; तरीही तो सापडला नाही.

रविवारी सकाळी काहींनी वडाळी, पोहरा या भागातसुद्धा शोध घेतला. अखेर त्यांनी शहर कोतवाली पोलिसांत शुभ बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनीही शोधमोहीम सुरू केली. खेळायला जातो, असं सांगून गेलेला शुभ अचानकपणे गेला कुठे? त्याचे कोणी अपहरण तर केले नाही ना, असे अनेक प्रश्न शुभच्या रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांपुढे उभे ठाकले होते. सगळे त्याच्या शोधात असताना अनपेक्षित शुभवार्ता त्याच्या वडिलांना मिळाली. रविवारी सायंकाळी भुसावळवरून फोन आला. तेव्हा स्वत: शुभच त्यांच्याशी बोलला. भुसावळला असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सर्वांनीच समाधान व्यक्त केले. मात्र, तो भुसावळला पोहोचला कसा, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
कोतवाली पोलिस भुसावळला रवाना
शुभ भुसावळला मिळाला असून, तो रेल्वे पोलिसांकडे आहे. ही माहिती मिळताच शुभच्या नातेवाइकांनी कोतवाली ठाणे गाठून पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच शुभला शहरात आणण्यासाठी कोतवालीचे कर्मचारी जावेद अहमद आणि गजू ढवळे तातडीने भुसावळला रवाना झाले आहेत; तसेच शुभचे काही नातेवाइकसुद्धा भुसावळला गेले.