आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फास्ट फूडवर वाढला जोर, पोरं झाली कमजोर; बालकांच्या आहाराकडे पालकांचे होतेय दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरीकरणामुळे बदललेली जीवनशैली, उपजिविकेसाठी व्यस्त असलेल्या पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, फास्ट फुडच्या संस्कृतीमध्ये हरवलेला सकस आहार, मोबाईल, इंटरनेटने गळचेपी केलेले मैदानी खेळ यामुळे बाल आरोग्याचा भयानक प्रश्न दिवसेंदिवस डाेके वर काढतो आहे.

कमजोर किंवा अशक्त बालकांचा प्रदेश म्हणून आदिवासी ग्रामीण भागाकडे आज पाहले जाते. मात्र वास्तव आपल्या घरामध्येही खेळत आहे. पोषक आहाराच्या अभावाने सुमारे ३० टक्के मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा कमी आढळून येते, तर, ५० ते ५० टक्के मुलींमध्ये अॅनेमिया (रक्ताची कमतरता) आढळून येतो. अापल्या दुर्लक्षाने तर आपली मुलं कमजोर होत नाहीत ना याची पालकांनी गार्भिर्याने दखल घ्यावी असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. एप्रिल ते मे या कालावधित राबवण्यात येत असलेल्या बालआरोग्य अभियानाच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने या बाबीचा आढावा घेतला आहे.

चॉकलेट, बिस्कीट, खारी, आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर मैद्यापासून बनलेल्या तळलेल्या पदार्थांचे अलिकडे आहारातील प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. याचे दुष्परिणाम अल्पवयातच दिसून येत आहेत. उपजिविकेसाठी धडपडणाऱ्या शहरातील आईजवळ मुलांच्या पोषक आहारासाठी फारसा वेळ नसल्याने फास्टफुडचा भाडीमार वाढला आहे. मुलांना शाळेतील डब्यातही रेडिमेट पदार्थ घ्यावे लागतात. अशा बिघडलेल्या खानपानामुळे अशक्तपणा, स्थूलपणा, वजन वाढणे, रक्ताची कमी आदी विविध तक्रारींना मुलांना लहानपणापासून सामोरे जावे लागत आहे. हीच मुले मोठी झाल्यावर ती रक्तदाब, मधूमेह हृदयरोगाची शिकार होऊ शकतात. त्यामुळे बालकांच्या खानपानाकडे हयगय करून चालणार नाही असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

आहारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ज्येष्ठ, पालक शिक्षक आदी घटकांशी संवाद साधून दिव्य मराठीने या बाबीवर प्रकाश टाकला आहे. मोबाईलगेममुळे मुलांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होत नाहीत. बाजारू आहार रसायने, किटकनाशकांमुळे पिकलेली फळे, भाजीपाला यामुळे शुद्ध सकस आहार हरवत चालला आहे. मुलांना स्वत:च्या हाताने भरवण्यासाठी व्यस्त असलेल्या आईकडे आज वेळ नाही त्यामुळे बालकांचे गैरसोय होऊन त्यांना नाना प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

ही सायकल थांबवायला हवी : मातेलारक्ताची कमतरता असेल तर कमी दिवसात प्रसुती होऊन. बालकही अशक्त कमी वजनाचे असते. यामध्ये जन्मलेली मुलगी असेल तर तिलाही अॅनेमिया असतो. पुढे अज्ञानामुळे मुलगा, मुलगी भेदभाव करून मुलींकडे पोषणासंदर्भात दुर्लक्ष होते. अल्पवयात मुलींचे लग्न होते.पुन्हा त्या मुलीला होणारे बाळ कमजोर अशक्त असते. ही सायकल पुढे चालत राहते ती थांबवण्याची आज नितांत गरज आहे.

'एक भाकर त्यावर डाळींचा पेंड, सोबत ग्लासभर ताक'
आम्ही लहान होतो तेव्हा असे आजार नव्हते. विषमुक्त आणि सकस आहार आम्हाला मिळत असे. मी अकरा वर्षाचा होतो तेव्हा सकाळी ज्वारीची एक भाकर त्यावर दाळींचा पेंड, सोबत ग्लासभर ताक अशी आमची न्याहरी असायची. बालपणापासून श्रमाचे काम करावे लागत असे म्हणून आहारही मजबूत होता. आताचे चिप्स, चॉकलेट, बिस्कीट सारखे पदार्थ आमच्या वेळी फारसे दिसतही नव्हते खाणे तर दूरच. दूर्याधनपाटील, नागरिक
मुलांमधील लठ्ठपणाही वाढतोय
मोबाइल, संगणकावरील गेम, कार्टून फिल्म, अभ्यासाचा ताणतणाव यामुळे तासनतास मुले घरातच बसलेली असतात. मैदानी खेळ खेळण्यासाठी ते बाहेर पडत नाहीत. शिवाय फास्टफुडचे वाढते प्रमाण यामुळे लहान वयातच मुलांमध्ये स्थुलपणा, वजन वाढणे या तक्रारी आढळत असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. या मुलांना उन्हातून जीवनसत्व मिळत नाही. व्यायामाअभावी त्यांची हाडे स्नायू मजबूत होत नाहीत, असे डाॅक्टरांचे म्हणणे अाहे.

खानपान, राहणीमान महत्त्वाचे
पोषक आहार मुलांच्या जीवनशैलीकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. वाढत्या वयानुसार मुलांना सर्वसमावेशक सकस आहाराची गरज असते ती पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र खानपान आणि राहणीमानाकडे दुर्लक्ष होत असल्याने अलिकडे स्थुलपणा, अशक्तपणा, अॅनेमिया अशा विविध तक्रारी समोर येत आहेत. डॉ.षिकेश नागलकर, बालरोगतज्ज्ञ.

पोषक आहाराला महत्त्व द्या
शरीराच्यावाढीसाठी पिष्टमय पदार्थ प्रथिनांचे योग्य प्रमाण आहारात असावे. हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेले कडधान्य, दाळी, दूध आदी घटकांचा आहारात समावेश असावा. असे पदार्थ मुलांना आवडत नसतील तर त्यांना विविध आकारात आकर्षक सजवून मुलांना खाऊ घालावे.
डॉ.अर्चना काकडे-सवाई, आहार अभ्यासक.