आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clash Between Two Groups In Amravati Travels Office

अमरावतीत टूर अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात तोडफोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या मनपा संकुलात नझीम नावाच्याव्यक्तीचे एस. एस. टूर अँड ट्रॅव्हल्स असे कार्यालय आहे. याच कार्यालयात शुक्रवारी दुपारी दोन गटांत वाद झाला. वाद झाल्यानंतर दुकानातील काचांची व अन्य साहित्याची तोडफोड झाली; तसेच कामासाठी आलेल्या कंत्राटदाराला मारहाण करण्यात आली.

सै. सादिक वल्द जयतुल्ला (56, रा. प्रवीणनगर) असे जखमी झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. सै. सादीक आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या एस. एस. टूरच्या कार्यालयात दुपारी गेले होते. नझीम हे आरटीओ दलाल म्हणून काम करतात. सै. सादिक यांच्या ट्रकच्या कागदपत्रांचे काम असल्यामुळे सै. सादिक यांनी नझीम यांचे सहकारी जमीर यांना 11 हजार 500 रुपये दिले होते. मात्र, त्यांना दोन हजार 300 रुपयांची पावती दाखवली असे तक्रारीत सादिक यांनी पोलिसांना सांगितले. रक्कम आणि पावतीमध्ये असलेली तफावत लक्षात घेऊनच सै. सादिक विचारणा करण्यासाठी नझीम यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी गेले. या वेळी जमीर कार्यालयात होते. सादिक व जामीर यांच्यात वाद झाला. या वेळी काही व्यक्ती दुकानात आले. या जमावाने दुकानातील साहित्यांची तोडफोड करून पळ काढला. मात्र, जमीरनेच दुकानातील काचांची व अन्य साहित्याची तोडफोड केल्याचे सादिक यांनी तक्रारीत म्हटले आहे. सादिक व त्यांचा मुलगा राजिक याला काच लागल्यामुळे ते जखमी झाले.

दुकानाच्या आतमध्ये सुरू असलेला वाद आजूबाजूचे सर्व नागरिक पाहत होते. मात्र, त्यांच्यात नेमके काय झाले, कोणालाही माहिती नाही. तोडफोड झाल्यानंतर या दुकानाला कुलूप लावून जमीर निघून गेले. या प्रकरणी सादिक यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. वृत्तलिहिस्तोवर जमीरने पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. तोडफोड झाल्याची माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार दीपक कुरुलकर, उपनिरीक्षक वैशाली चव्हाण व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते.