आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- अमरावती विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी असलेल्या 12.50 कोटी रुपयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या अन्यायाबाबत मुख्यमंत्री तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.
मूलभूत सुविधेअंतर्गत मिळालेल्या 25 कोटी रुपयांमधील 12.50 कोटी रुपयांचा मुद्दा विभागीय आयुक्तांनी निकाली काढला होता. महापौर वंदना कंगाले यांनी प्रस्तावित केलेल्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील कामांच्या यादीला विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी मंजुरी दिली होती. या यादीला डावलत आमदार रावसाहेब शेखावत यांनी वेगळीच यादी तयार करीत त्यातील विकासकामांना मंजुरीदेखील मिळवली. आमदार शेखावत यांच्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्मथक नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश नसल्याने त्यांचे पित्त चांगलेच खवळले आहे. उपमहापौर नंदकिशोर वर्हाडे यांच्या कक्षात बैठक घेत याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्याकडे तक्रार करणाचा निर्णय घेण्यात आला. या वेळी उपमहापौर यांच्या व्यतिरिक्त शहर सुधार समिती सभापती शेख हमीद शद्दा, माजी स्थायी समिती सभापती जावेद मेनन, नगरसेवक मिलिंद बांबल, प्रवीण मेर्शाम उपस्थित होते.
साडेबारा कोटी प्रकरण अद्याप कोर्टात
25 कोटीतील 12.50 कोटी बडनेरास मिळावे म्हणून आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून प्रयत्न केले. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात नेले. उच्च न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही.
अहवाल मागितला
स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर शासन निर्णयानुसार नियम क्रमांक तीन अन्वये 30 मार्च 13 ला महापालिकेला 25 कोटी मंजूर झाले. त्यापैकी 12.50 कोटी न्यायप्रविष्ट आहे. उर्वरित 12.50 कोटींचे विभागीय आयुक्तांच्या समितीद्वारे वाटप झाले. त्याबाबत अहवाल मिळण्यासाठी उपमहापौर नंदकिशोर वर्हाडे यांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
‘नगरोत्थान’ची कामे निधीतून
शेगाव चौक ते जुना कॉटन मार्केट चौकदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मिळालेला निधी नगरसेवकांच्या वॉर्डातील विकासकामांवर खर्च होणे अपेक्षित होते. तसे न होता जे काम नगरोत्थान योजनेतून करायला पाहिजे होते, त्या कामासाठी निधी दिल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.