आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीय संगीत मैफलीने महोत्सवात भक्तिरसाची उधळण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवरा आश्रम - ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’ यासारखा अभंग असो की ‘हरदम मौला तेरो नाम’सारखे आर्जव गीत.. पुण्याच्या गायिका अंजली मालकर यांनी विवेकानंद जयंती महोत्सवात अतिशय ताकदीने सादर केलेल्या अनेकविध गीतांना राज्यभरातून आलेल्या रसिकांनी भरभरून दाद दिली आणि मैफलीत भक्तिभावाच्या रंगांची उधळणच झाली. स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील स्वामी विवेकानंद आश्रमात आयोजित महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात रविवारी अंजली मालकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला.
गायनाची सुरुवात अंजलीतार्इंनी आर्जवप्रधान गीतांनी केली. ‘मोरी अरज सुनो गिरधारी’ या अलय्या बिलावल या अनवट रागातील बंदिशीने त्यांनी रसिकांवर जादू केली. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारे ‘हरदम मौला तेरो नाम’हे जौनपुरी रागातील परवरदिगारचे आर्जव करणारी त्रितालाची शास्त्रीय रचनाही त्यांनी तितक्याच ताकदीने सादर केली. रसिकांनी या गीताला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. संत नामदेवांच्या ‘सुंदर ते ध्यान’, ‘अनंत रूपाचे हे सार, अनंत निधीचे हे सार’, संत शुकदास महाराजांचे ‘वसंत आल्याची चाहूल लागता’ यांसारख्या अभंगांनी त्यांनी वातावरण भक्तिमय करून सोडले. ‘हरिनामाचे बांधून पैंजण’, ‘जो भजे हरी को सदा, वो परमपद पायेगा’ यासारखे भक्तिगीतही त्यांनी सादर केले.
औरंगाबादच्या गजानन केचेंची साथ: राज्यभरातून उपस्थित असलेल्या रसिक श्रोत्यांनी अंजलीतार्इंच्या गायनाला भरभरून दाद दिली. त्यांना हार्मोनियमवर औरंगाबादचे प्रा. गजानन केचे यांनी, तर शाहीर ईश्वर मगर यांनी टाळाची साथसंगत केली.