नागपूर- सैनिक हा एकटा नसून देशातील प्रत्येक नागरिक सैनिकाच्या पाठीशी आहे. भारत भूमीच्या संरक्षणासाठी अनेक सैनिकांनी
आपले प्राणाअर्पण केले. नैसर्गिक आपत्तीवेळी सुध्दा देशाला गरज असेल तेव्हा सैनिक तत्पर असतो. त्यामुळे देशासाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या सैनिकांच्या अडचणी दूर करुन त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मातृभूमीचे संरक्षण करतांना आपल्या प्राणाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणाकरीता उभारण्यात आलेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2014 साठी सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथील मुख्यमंत्री यांचे निवासस्थान रामगिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ध्वजदिन निधी 2014 संकलनाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शेजारी राष्ट्राकडून होणारे छुपेयुद्ध, आतंकवादी कार्यवाही, नक्षलवाद या गंभीर समस्यांना देशाला सामोरे जावे लागत आहे. या समस्यांना तोंड देतांना स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करण्याचे अमूल्य कार्य सैनिक करीत असतात. त्यांच्या या कार्यामुळे आपण देशात शांततेने राहू शकतो. मजबूत व शक्तिशाली भारत निर्माण करण्यामध्ये सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. या महान कार्यामध्ये नागरिकांचा सुध्दा सहभाग असणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठीत नागरिक, उद्योगपती यांनी मोठ्या संख्येने सैनिकांच्या कल्याणासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमत्र्यांनी सैनिक कल्याण निधीसाठी सढळ हस्ते मदत करणाऱ्या नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच माजी सैनिक संजयकुमार सिंग यांनी आपल्या एकूलत्या एक मुलाचे अपघाती निधन झाल्यानंतर अवयव दान करुन दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान दिले त्यांचाही सपत्नीक सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे मागील वर्षी निधी संकलनाचे नागपूर जिल्ह्याचे 1 कोटी 30 लाखांच उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल नागपूर जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वीर सैनिक, वीर माता-पिता, वीर पत्नी यांचा शाल व श्रीफळ तसेच धनादेश देऊन सत्कार केला.