आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM To Announce More Financial Help For Flood Effected People In Vidarbha

मृतांच्या वारसांना अतिरिक्त एक लाखांची मदत, विधीमंडळात होणार पॅकेजची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अतिवृष्टी व पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून 1 लाख रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम रविवारपर्यंत पूर्ण होणार असून सोमवारी विधिमंडळात पॅकेजची घोषणा केली जाईल, अशी माहिती देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भात ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता फेटाळून लावली.

विदर्भातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाला भेट दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती व नागपूर विभागातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन कार्यमंत्री पतंगराव कदम, जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टी व पुरात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र, एकूणच परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री निधीतून अतिरिक्त 1 लाखाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे मदतीबाबतची घोषणा बाहेर करता येणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरूआहे. रविवारी सायंकाळपर्यंत सर्व अहवाल शासनाकडे येणार असून सोमवारी मदतीच्या पॅकेजची घोषणा केली जाईल.

डीपीसीचा निधी वळविणार
अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान आहे. अनेक भागात जमीन खरडून गेली आहे. दुबार पेरणीची गरज भासल्याच बियाण्यांची अडचण नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याच्या डीपीसी मधून 15 टक्के रक्कम विशेष निधी म्हणून वापरली जाणार आहे. नाला खोलीकरणाची कामे अत्यावश्यक झाली आहेत. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचे प्रयत्नही केले जाणार आहेत.

नदी आणि नाल्यांवरील अतिक्रमणामुळे आपत्तीत भर पडली आहे. त्यामुळे यापुढे अतिक्रमण अजिबात सहन केले जाणार नसून ते त्वरीत काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी खाणींच्या मातीच्या ढिगार्‍याखालून नाले बंद होण्याचे प्रकार घडले आहेत. वीज प्रकल्पांची राखही काही ठिकाणी कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे खाण विभागाच्या अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचेही सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.