आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colour Cotton Production Encourage, Employment Increase

रंगीत कापूस उत्पादनवाढीस प्रोत्साहन; रोजगार वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नागपूर संशोधन केंद्रातील कथ्थ्या रंगाचा कापूस.
नागपूर - ससा रे ससा, दिसतो कसा
कापूस पिंजून, ठेवला जसा...
असे यापुढे कदाचित म्हणता येणार नाही. ससा आणि कापसाचा रंग शुभ्र पांढरा असल्याने ही कविता लिहिली गेली. परंतु आता कापूस रंगीत उत्पादित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत सेंद्रिय रंगीत कापसाच्या व्यावसायिक लागवडीला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचा निर्णय झाला आहे. देशात रंगीत कापसाचे उत्पादन वाढवून छोटे-छोटे उद्योग व रोजगार वाढीला प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार आहे.

यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांनी तीन बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. केशव क्रांती यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. धारवाड (कर्नाटक) येथे सोमवारी केंद्रीय वस्त्रोद्योग तसेच कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शेतकरी, उद्योगपती तसेच फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील नामवंतांना बोलावण्यात आल्याचे क्रांती यांनी सांगितले.

संपूर्ण देशभरात कुठेच रंगीत कापसाची व्यावसायिक लागवड होत नव्हती. मागणी आणि बाजारपेठ नसल्यामुळे हा विषय मागे पडला होता. परंतु ‘मेक इन इंडिया’अंतर्गत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यासाठी पुढाकार घेतला असल्याने रंगीत कापसाच्या व्यावसायिक लागवडीला चालना मिळाली आहे. शेतक-यांना रंगीत कापसाच्या जाती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन मंडळाचे शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. कापूस शास्त्रज्ञ विनीता गोतमारे, डॉ. पुनीत मोहन, डॉ. सुमन बालासिंग यावर काम करीत आहेत. त्याला केंद्र सरकारच्या प्रोत्साहनाने आता वेग येत आहे.
नागपूरच्या संशोधन केंद्र परिसरात प्रायोगिक तत्त्वावर रंगीत कापसाची लागवड करण्यात आली आहे. रंगीत कापसाच्या जाती हायब्रीड नसून संपूर्ण देशी वाणाच्या राहणार आहेत. विदेशात सेंद्रिय उत्पादनांना मागणी असल्याने रंगीत कापसाची शेती संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात येईल, असे क्रांती यांनी सांगितले.

जपानकडून मागणी
सेंद्रिय रंगीत कापसाला जगभरात मागणी आहे. जपान याचा प्रमुख ग्राहक आहे. जपानला दरवर्षी ५० हजार मीटरची गरज आहे. कर्नाटकातील धारवाड कृषी विद्यापीठात सुमारे १०० एकरांवर रंगीत कापसाची लागवड होते. त्यातून ५ हजार मीटर पुरवठा होतो. मात्र, व्यावसायिक लागवड केल्यास शेतक-यांना द्यायला विद्यापीठांकडे पुरेसा पैसे नसल्याने पुढे हे क्षेत्र वाढवता येत नसल्याचे सांगितले जाते.

नऊ किलो धागा तयार
संशोधन संस्थेतील रंगीत कापसापासून नऊ किलो धागा तयार करण्यात आला आहे. हा धागा आनंदवन, वरोरा यांना देण्यात येणार असून ते याचे कापड तयार करून देतील. वर्धा येथील महात्मा गांधी इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सूत तयार करण्यात आले. रंगीत कापसात गडद व फिकट कथ्था, हिरवा रंग तयार करता येतो.

जंगली जातीचा बगिचा
जगभरात जंगली कापसाच्या एकूण ५० जाती आहेत. त्यापैकी २६ जातींचा बगिचा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत आहे. देशातील हा एकमेव बगिचा आहे. यातील रायमोंडी या जंगली कापसाच्या जातीत जिन टाकून रंगीत कापसाचे देशी झाड तयार करण्यात आल्याची माहिती विनीता गोतमारे यांनी दिली. साधारणपणे पांढ-या कापसाच्या धाग्याची लांबी २१ ते २४ मिमी असते, पण रंगीत कापसाच्या धाग्याची लांबी २६ मिमी आहे.

चार जाती विकसित
जगात अमेरिकन, इजिप्शियन व आरबोरियम या जातींची लागवड होते. भारतात मात्र या तिन्ही जातींची लागवड केली जाते. विनीता गोतमारे यांनी वैदेही-९५, तर डॉ. पुनीत सिंग यांनी सीएनए-४०५, सीएनए-४०६ व सीएनए-४०७ या तीन रंगीत कापसाच्या जाती विकसित केल्या आहेत. कथ्थ्या रंगाचा हा कापूस ऊन तापते तसा आणखी गडद होत जातो. याचा रंग अजिबात जात नाही, असे डॉ. पुनीत मोहन यांनी सांगितले. आरबोरियम जातीमध्ये पाणी शोषून घेण्याची जबरदस्त क्षमता असल्याने मेडिकल कॉटनसाठी हा कापूस वापरला जातो.

फायदा काय ? : छोटे उद्योग, रोजगार वाढणार
देशात रंगीत कापसाचे उत्पादन वाढल्यानंतर छोट्या- छोट्या गावात त्यापासून सूत तयार करण्याचे उद्योग उभारून रोजगार वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. कापसापासून सूत तयार करण्याच्या काही छोट्या (पोर्टेबल) मशिन्स उपलब्ध आहेत, त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देत शेतक-यांना लघु उद्योजक बनविण्याचा यामागे उद्देश आहे. आणि शेतकरी किंवा लघु उद्योजकांकडून तयार होणारे सूत देशातील मोठमोठ्या कापड कंपन्यांना पुरविण्यात येणार आहे. तसेच आपल्या देशातील कापड उत्पादनाची गरज भासल्यानंतर जपानमध्येही हे सूत निर्यात करण्याबाबतही विचार केला जात आहे.