आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congrees Candidate First List Declared In Yavatmal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या पहिल्या यादीत यवतमाळमध्ये पुरके, खडसे, कासावार पहिल्याच यादीत झळकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - युती पाठोपाठोपाठ आघाडीनेही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, पक्षांतर्गत उमेदवारी देण्याचा गुंता पूर्णत: सुटला नाही. काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, वणी, राळेगाव, उमरखेड येथील उमेदवार काँग्रेसने जाहीर केले. परंतु, यवतमाळ आणि आर्णी येथील भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. मात्र, स्वबळावर निवडणूक लढवण्यापूर्वी काँग्रेसने काही उमेदवार घोषित केले. जिल्ह्यातील वणी येथे विद्यमान आमदार वामनराव कासावार, राळेगाव येथील विद्यमान आमदार वसंतराव पुरके, उमरखेड येथील विद्यमान आमदार विजय खडसे यांची नावे पहिल्याच यादीत घोषित झाली आहेत. शनिवारपर्यंत हे नामांकन दाखल करणार आहेत.
आर्णीत चर्चेला उधाण
आर्णी येथे काँग्रेसचे शिवाजीराव मोघे हे विद्यमान आमदार आहेत. या ठिकाणी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धकच नाही. परंतु, पहिल्या यादीत शिवाजीराव मोघे यांचे नावच नसल्याने चर्चेला पेव फुटले. माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांच्यात काही महिन्यांपासून मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त असून, त्या अनुषंगाने फक्त वर्चस्व दाखवण्यासाठी असा प्रकार होत असल्याची चर्चा रंगत आली आहे.
भाजपचे भिजत घोंगडे
यवतमाळातजशी काँग्रेसची स्थिती आहे, तशीच भाजपमध्येही आहे. येथेही उमेदवारीसाठी राजाभाऊ ठाकरे, मदन येरावार, बाबासाहेब गाडे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. येरावार यांनी तर प्रचारसुद्धा सुरू केल्याचे वृत्त आहे. परंतु, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि ज्यांची तिकीट कापली गेली, ते अधिकृत उमेदवाराचे किती प्रामाणिकतेने काम करतील, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे.
यवतमाळचा तिढा कायम
यवतमाळविधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकर या एका वर्षात मतदारांवर प्रभाव पाडू शकल्याने येथे उमेदवार बदलाचे वारे वाहत आहे. माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे, दर्डा गटाचे बाळासाहेब मांगूळकर हे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. राहुलचे नाव अधिक चर्चेत असल्याची माहिती आहे. मात्र, ऐन वेळेवर नंदिनीलाच तिकीट देण्याच्या सूचना हायकंमाडने दिल्या, तर नंदिनी पारवेकर यांनासुद्धा उमेदवारी कायम राहू शकते. मात्र, यवतमाळच्या उमेदवारीवरून चांगलेच महाभारत घडत असल्याची माहिती आहे.