आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलास मुत्तेमवार, अंजली दमानिया यांच्याशी कडवी झुंज; कॉँग्रेसचा गड सर करण्याचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर लोकसभेचा बालेकिल्ला राखण्यासाठी मागील निवडणुकीत काँग्रेसला घाम गाळावा लागला. विजय मिळाला असला तरी मताधिक्यात मोठी घट झाली. त्यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती, देशभरात सुरू असलेली पक्षाची पीछेहाट, अंतर्गत गटबाजी अशा अनेक कारणांपायी यंदा काँग्रेसच्या आव्हानात भर पडली आहे. त्यातच भाजपने ‘हेवीवेट’ नेते नितीन गडकरी यांना रिंगणात उतरवल्याने उपराजधानीत खर्‍या अर्थाने बिग फाइट होण्याची चिन्हे आहेत. बसपा आणि ‘आप’ची कामगिरी आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण हे दोन प्रमुख घटकही या लढतीवर प्रभाव पाडतील, असे दिसते.

नागपूर लोकसभा मतदारसंघ आजवर काँग्रेसचा गड राहिलेला आहे. दलित आणि मुस्लिम मतदारांचे मोठे प्रमाण हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. रामलाटेच्या काळातील अपवाद सोडला तर नागपूरचा गड काँग्रेसच्या दृष्टीने अभेद्य असाच राहिला. सात वेळा खासदारकीचा अनुभव असलेले विलास मुत्तेमवार यंदा नागपुरातून पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 2009 च्या निवडणुकीत मुत्तेमवार यांच्या मताधिक्यात मोठी घट होऊन ते 24 हजारांवर आले. या वेळी त्यांचा सामना भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी असल्याने त्यांच्यापुढे अतिशय प्रबळ असे आव्हान निर्माण झाले आहे. काट्याच्या लढतीत मतदारसंघातील तिसरी शक्ती समजली जाणारी बसपा, राजकारणातील नवा खेळाडू आम आदमी पार्टीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

‘आप’चे टार्गेट गडकरीच
मागील निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराने नागपुरात 1 लाख 18 हजार मते घेतली होती. त्याचा फटका प्रामुख्याने भाजपच्या ओबीसी मतपेढीला बसला. अजून बसपाची उमेदवारी जाहीर व्हायची आहे. जातीय समीकरण लक्षात घेऊन उमेदवार पेरणार्‍या बसपाकडे दोन्ही प्रमुख पक्षांचे लक्ष आहे. ‘आप’ने अंजली दमानिया यांना मैदानात उतरवले आहे. गडकरी यांचा पराभव या एकमेव ध्येयाने लढत आहेत. त्यांनी गडकरींवर आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.

दिग्गजांना आधार डमींचा
दलित आणि मुस्लिम मतपेढी शाबूत राखण्याचे आव्हान मुत्तेमवार यांच्यापुढे आहे. तर भाजपचा भर पारंपरिक मतांसह ओबीसी मतांवर आहे. याशिवाय दलित आणि मुस्लिमांना आकर्षित करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मुत्तेमवार यांचा भर प्रामुख्याने पारंपरिक मतांवर असेल, तर भाजपकडून गडकरी यांची राष्ट्रीय नेता, विकासपुरुष अशी प्रतिमा मांडली जात आहे. मोदी लाटेचाही त्यांना फायदा होऊ शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भक्कम फळीही गडकरींसाठी कामाला लागली आहे.

विलास मुत्तेमवार यांची बलस्थाने : स्वच्छ प्रतिमा, जनसामान्यांमध्ये रुळणारा नेता, विकासासाठी प्रयत्न करणारे म्हणून ओळख, निवडणूक लढण्याचा प्रदीर्घ अनुभव, काँग्रेसची भक्कम मतपेढी पाठीशी.
उणिवा : स्थानिक नेत्यांशी कायम झडणारे वाद, विकासासाठी वजन पूर्णपणे न वापरल्याचा ठपका, काँग्रेसचा जुनाच चेहरा म्हणून ओळख.

नितीन गडकरी बलस्थाने : विकासपुरुष म्हणून प्रतिमा, राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून ओळख, सर्वपक्षीय नेत्यांमध्ये वावर आणि प्रभाव, नवमतदारांना आकर्षित करण्याची क्षमता.
उणिवा : ‘पूर्ती’तील भ्रष्टाचाराचे लागलेले आरोप, फटकळ स्वभावापायी अनेकांची नाराजी, मतदारसंघातील प्रतिकूल सामाजिक समीकरण .

अंजली दमानिया यांची बलस्थाने : नवा चेहरा, भ्रष्टाचाराचे ठोस आरोप नाहीत, नवमतदारांचा काही वर्ग पाठीशी, ‘आप’बद्दलचे लोकांमधील आकर्षण.
उणिवा : बाहेरच्या आणि नवख्या उमेदवार, ‘आप’चा फारसा प्रभाव नाही, मतदारसंघातील विषयांची जाण नाही, राजकारणाची पाटी कोरीच.