आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर काँग्रेसचा, की खोडकेंचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेला आगामी महापौर खोडके गटाचा, की काँग्रेसचा याबाबत विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून व्यूहरचना आखणे आरंभ झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाल्याने काँग्रेस आघाडी धर्म पाळेल, अशी शक्यता धूसर झाली आहे. गटनेते प्रकरणाच्या निकालानंतर काँग्रेस महापौर पदासाठी राष्ट्रवादीला सोडून खोडके गटाला प्राधान्य देईल का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे आगामी महापौर निवडणुकीत राजकीय बदलाचे संकेत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहेत.

मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने गटनेते प्रकरणात अविनाश मार्डीकर यांना क्लीन चिट दिल्याने महापालिकेतील राजकीय समीकरण बदलले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीकडे सात, तर खोडके गटाकडे १६ नगरसेवक, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, शुक्रवारी आलेल्या निकालानंतर गटनेते म्हणून मार्डीकर कायम राहणार असल्याने सातमधील अन्य तीन नगरसेवकदेखील परत येणार असल्याचा दावा खोडके गटाकडून करण्यात आला.

निकालानंतर खोडके गटाचे वर्चस्व कायम असून, महापौर निवडणुकीत गटनेते म्हणून मार्डीकर यांचाच व्हीप चालणार आहे. आमदार राणा यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ चार नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. युवा स्वाभिमान व राष्ट्रवादीचे मिळून त्यांची संख्या जेमतेम सात किंवा आठच्या वर जाणार नाही. खोडके गटाकडे महापौर पदावर दावा करण्याइतके संख्याबळ असले, तरी आघाडी धर्मानुसार काँग्रेसची साथ मिळेल की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्याने संजय खोडके यांचे राष्ट्रवादीसोबत काडीमोड झाला आहे. राष्ट्रवादीत नसल्याने काँग्रेसदेखील आघाडी धर्मानुसार खोडके गटाला समर्थन करतील, अशी शक्यता कमीच आहे. अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसला डावलत काँग्रेसने खोडके गटासोबत सलगी केली, तर राज्यात त्याचा वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. बदलते राजकीय समीकरण लक्षात घेता, काँग्रेस देखील महापौर पदाची आयती चालून आलेल्या संधीवर पाणी फेरू देणार नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसमधील लक्ष्मीपती महिला सदस्यांनी महापौर पद मिळावे म्हणून तयारदेखील आरंभ केली आहे.
पक्षांतर्गत आणि बाहेरील सदस्यांचे समर्थन मिळवण्यासाठी आकडेमोड आरंभ केल्याची माहिती आहे. मार्डीकर गटास समर्थन न केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता शिवसेना, भाजप व अन्य पक्षांना एकत्र घेत महाआघाडीची सत्तादेखील निर्माण होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार रावसाहेब शेखावत यांचे कट्टर राजकीय विरोधक व महायुतीत भागीदारी करणाऱ्या रिपाइं (आठवले) गटाच्या सदस्यांनी एकत्र येत जनकल्याण-जनविकास-रिपाइं फ्रंट तयार केला आहे. या स्थितीमध्ये जनकल्याण-जनविकास-रिपाइं फ्रंट काँग्रेससाेबत जाण्याची शक्यता कमीच आहे.

काँग्रेससाठी अनुकूल : पालिकेतील सर्वांत मोठा पक्ष असल्याने काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी अनुकूल वातावरण आहे. आघाडीमध्ये २९ सदस्य असल्याने १६ अन्य सदस्यांची काँग्रेसला मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादीचा नंदकिशोर वऱ्हाडे गट, बहुजन समाज पक्ष, युवा स्वाभिमान व अन्य अपक्षांची मदत घेत काँग्रेसने सत्तास्थापन केल्यास अन्य पदांवर दावेदारदेखील कमी राहतील. महापौर पद काँग्रेस, उपमहापौर पद बसपा तर स्थायी समिती पद वऱ्हाडे गटाला मिळणे शक्य आहे. पालिकेतील सत्ता वाटपात दावेदार कमी असल्याने भांडणेदेखील कमी राहतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
काँग्रेस वगळता ‘खिचडी’
काँग्रेस वगळता खोडके गटाने शिवसेना, भाजप व अन्य गटांना एकत्र घेत सत्ता स्थापन केल्यास पदांसाठी वाद वाढतील. अधिक संख्या असल्याने खोडके गटाचा महापौर पदावर, तर शिवसेना उपमहापौर पदावर दावा करण्याची शक्यता राहील. स्थायी समिती पद व अन्य समित्यांसाठी अंतर्गत वाद राहील.
साम-दाम-दंड सूत्राचा हाेणार वापर
आगामी अडीच वर्षांसाठी काँग्रेसचा महापौर असावा, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर साम-दाम-दंड या सूत्राचा वापर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांना कमी सदस्यांसोबत बोलणी करावी लागेल, अशा स्थितीमध्ये सत्तेत वाटा किंवा दाम सूत्राचा वापर होण्याची शक्यता आहे. महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी किंमत मोजण्याची तयारीदेखील ठेवली असल्याची माहिती आहे.