आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Nationalist Congress Debating Over Opposition Leadership

विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत खडाजंगी; माणिकराव , तटकरे आमने-सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शेतकरी व जनतेच्या प्रश्नावर एकत्र आल्याचे कितीही दाखवले जात असले तरी विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या एकेकाळच्या मित्रपक्षांत टोकाचे मतभेद असल्याचे गुरुवारी चव्हाट्यावर आले. विरोधी पक्षनेतेपद आज घोषित करावे,अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. पण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्याला आक्षेप घेतला. ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत शरद रणपिसे यांनीही तटकरेंचा दावा चुकीचा असल्याचे सांगितल्याने, त्यावर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. तसेच राष्ट्रवादी आमदारांनी वेलमध्येही धाव घेतली.

प्रश्नोत्तरांचा तास आटोपताच राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीसाठी जोर धरला. जोरदार घोषणाबाजी करत परिषदेचे कामकाज रोखून धरले. काही आमदारांनी वेलमध्ये धाव घेतली, तर काहींनी तेथेच बैठक मारली. तटकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे सर्वाधिक २७ आमदार असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क आहे. तसा प्रस्तावही सभापतींना देण्यात आला आहे.’ मात्र, काँग्रेसकडूनही या पदासाठी अर्ज देण्यात आला आहे. सभापतींनी घाईगडबडीत निर्णय न घेता विचारांती ठरवावे’, असे ठाकरे, रणपिसे यांनी सांगितल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांचा पारा चढला.

‘१२ नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठरावावेळी कोण भाजपच्या बाजूने होते. कोणाच्या पाठिंब्यावर त्या वेळी भाजप सरकार तरले, याचे आधी आम्हाला उत्तर मिळाले पाहिजे,’ अशी मागणी काँग्रेसच्या रणपिसे यांनी केली. त्यावर भडकलेले तटकरे म्हणाले, ‘सरकारला आम्ही पाठिंबा दिला नव्हता. बहुमताच्या प्रक्रियेत आम्ही भाग घेतला नाही. आमचा या पदावर हक्क आहे.’ त्यावर मात्र काँग्रेसचे आमदारही आपल्या भूमिकेपासून मागे हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे सभापती देशमुख यांनी काही काहीच निर्णय दिला नाही.

सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव
विधान परिषदेत सर्वाधिक आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटी सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेले दोन दिवस राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करावी, अशी मागणी आम्ही करत असतानाही सभापती आमची मागणी मान्य करत नसल्यामुळे आम्हाला अविश्वास ठरावाचे पाऊल उचलावे लागले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.