आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर विभागाचा ग्राउंड रिपोर्ट: काँग्रेसची घडी विस्कटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सणावाराच्या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा दिवाळीच्या बाजारपेठेवरही प्रभाव जाणवत आहे. यंदाच्या आकाश कंदिलांवर विविध राजकीय पक्ष नेत्यांच्या छबी झळकत आहेत.
लोकसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवाच्या धक्क्यात वावरत असलेली काँग्रेस विधानसभेच्या प्रचारातही मागे पडली आहे. दुसरीकडे, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या फौजा मात्र सर्वच मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढत आहेत. काँग्रेसची गाडी घसरणीच्या मार्गाला, तर भाजप मागील कामगिरीचा आलेख आणखी उंचावण्याच्या स्थितीत आहे.
तिरंगी, चौरंगी लढतींपायी होणारे मतांचे विभाजन, जातीय समीकरणे कोणाच्या पथ्यावर पडणार? या प्रश्नांची नेमकी उत्तरे सध्या तरी मिळत नसल्याने अनेक मतदारसंघांमध्ये सामना कोणत्या बाजूला झुकणार, याचे अंदाज बांधणे भल्याभल्यांना कठीण होऊन बसले आहे.
नागपूर जिल्हा - १२जागा
फडणवीसांकडे राज्याचे लक्ष
नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांमध्ये काही अपवाद सोडले, तर ब-याच ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यात दक्षिण-पश्चिम नागपुरात सुरू असलेल्या झुंजीकडे सर्वांचे लक्ष आहे. फडणवीस यांना अडचण नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रचाराला जातीय वळण देण्याचे प्रयत्न भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दक्षिण नागपुरात काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी, भाजपचे सुधाकर कोहळे, शिवसेनेचे किरण पांडव व सेनेचेच बंडखोर शेखर सावरबांधे असा तुल्यबळ सामना आहे. उत्तर नागपुरात भाजपचे मिलिंद माने आणि बसपचे किशोर गजभिये या दोघांनीही काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांना जबरदस्त आव्हान दिले आहे, तरीही राऊत यांची स्थिती मजबूत वाटते. पूर्व नागपुरात भाजपचे कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यातील सामना रंगतदार होईल. सध्या तरी खोपडेंचे पारडे जड वाटते. पश्चिम नागपुरात भाजपच्या सुधाकर देशमुख यांना काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी आव्हान दिले असल्याने भाजप ही जागा राखणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. मध्य नागपुरात भाजपचे विकास कुंभारे, काँग्रेसचे अनिस अहमद, राष्ट्रवादीचे कामिल अन्सारी आणि काँग्रेसच्या बंडखोर आभा पांडे यांच्यात चुरस आहे. ग्रामीणमधील सावनेर मतदारसंघात उमेदवाराचा अर्जच बाद झाल्याचा फटका भाजपला बसणार आहे. आता कोणाला पाठिंबा द्यायचा हा भाजपचा निर्णय झाला नसल्याने काँग्रेसचे सुनील केदार यांना पुन्हा संधी मिळण्याचे चित्र आहे. काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपचे आशिष देशमुख आहेत. या ठिकाणी अनिल देशमुख सुरक्षित वाटतात. हिंगणात राष्ट्रवादीचे रमेश बंग, भाजपचे समीर मेघे, काँग्रेसच्या कुंदा राऊत आणि शिवसेनेचे प्रकाश जाधव हा चुरशीचा चौरंगी मुकाबला आहे. उमरेडमध्ये भाजपचे सुधीर पारवे आणि काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्यात थेट लढत असून पारवे वरचढ ठरू शकतात. रामटेकमध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल व भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यात काट्याची लढत आहे, तर कामठीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना काँग्रेसचे राजेंद्र मुळक व शिवसेनेचे तापेश्वर वैद्य यांचे आव्हान आहे. बावनकुळेंचे पारडे जड वाटते.

भंडारा - ०३ जागा
जातीय समीकरणांचे कोडे सुटेना
पोवार, कुणबी, दलित मतदारांची एकगठ्ठा मते असलेल्या भंडारा जिल्ह्यात या जातींची मते खेचण्याची स्पर्धा काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत लागली आहे. भंडारा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर, बसपच्या देवांगना गाढवे आणि भाजपचे रामकृष्ण अवसरे यांच्यातील तिरंगी सामन्याचे भाकीत वर्तवणे कठीण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी प्रचारात माघारल्याचे दिसते. तुमसर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचा घात करण्यासाठी टपलेले असताना भाजप आणि शिवसेना अशी थेट लढत आकारास आली आहे. साकोलीत काँग्रेसचे सेवक वाघाये, राष्ट्रवादीचे सुनील फुंडे आणि भाजपचे बाळा काशीवार यांच्यात वाघायेंचा निवडणूक लढवण्याचा अनुभव कामी येऊ शकतो.
व्होट बँकेवर सा-यांचे लक्ष
जातीच्या आधारावर राजकारण करण्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाढती स्पर्धा. जातीची मते कोणाच्या पारड्यात पडणार यावरच विजयाचे गणित.

गोंदिया - ०४ जागा
भाजपला बसणार नाराजीचा फटका
गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे गोपाळ अग्रवाल, भाजपचे विनोद अग्रवाल आणि राष्ट्रवादीचे अशोक गुप्ता यांच्या लढाईत ओबीसी मतांचे समीकरण आपल्या बाजूने झुकवण्याचे शिवसेनेचे राजकुमार कुथे यांचे प्रयत्न सुरू आहेत. अर्जुनी मोरगावमध्ये काँग्रेसच्या दोन बंडखोरांमुळे भाजपचे राजकुमार बडोले यांचे पारडे जड आहे, तर आमगावात काँग्रेसचे रामरतन राऊत यांच्या विरोधात भाजपचे संजय पुराम हे अगदीच नवखे ठरत असताना भाजपच्या मतांचे विभाजन होऊ शकते. तिरोडा मतदारसंघात काँग्रेसचे परसराम कटरे आणि भाजपचे विजय रहांगडाले यांच्यात थेट सामना असून खुशाल बोपचे यांना तिकीट नाकारल्याचा फटका भाजपला किती बसतो, यावर लढतीचे चित्र अवलंबून राहील.
शिवसेना उघडणार खाते
मागील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला समसमान यश देणा-या गोंदिया जिल्ह्यात यंदा शिवसेनेला खाते उघडण्याची संधी दिसत आहे.

गडचिरोली - ०३ जागा
काका-पुतण्याची रंगतदार लढाई
गडचिरोलीतील तिन्ही मतदारसंघांमध्ये काट्याच्या तिरंगी लढती होत आहेत. सर्वाधिक लक्षवेधी लढत अहेरी मतदारसंघात आत्राम राजघराण्यात होत आहे. राष्ट्रवादीच्या वतीने लढत असलेले माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांचे पुतणे अंबरीषराजे यांनी भाजपकडून जोरदार आव्हान दिले आहे. या दोघांच्या लढतीत अपक्ष दीपक आत्रामही स्पर्धेत ठाण मांडून असले, तरी धर्मरावबाबांचा अनुभव वरचढ ठरेल, असे सांगितले जाते. युवाशक्ती संघटनेचा मोठा गट शिवसेनेत दाखल झाल्याने गडचिरोली मतदारसंघात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली आहे. शिवसेनेचे केसरी उसेंडी, राष्ट्रवादीच्या भाग्यश्री आत्राम आणि भाजपचे डॉ. देवराव होळी असा तिरंगी सामना कुठल्या बाजूला झुकेल, याचा अंदाज काढणे कठीण आहे.

चंद्रपूर जिल्हा - ०६ जागा
मुनगंटीवार अडकले मतदारसंघात
बल्लारपूरमध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेसच्या घनश्याम मूलचंदाणी यांनी जबरदस्त आव्हान दिले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय नेते असलेले मुनगंटीवार मतदारसंघात अडकले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूरमध्ये हिंदू व दलित मतांचे ध्रुवीकरण घडवून खाते उघडण्याचे शिवसेनेचे उमेदवार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न आहेत. या मतदारसंघात जोरगेवार, भाजपचे नाना श्यामकुळे आणि काँग्रेसचे महेश मेंढे असा त्रिकोणी मुकाबला आहे. वरोरा मतदारसंघात माजी मंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात त्यांच्या नातेवाईक असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. आसावरी देवतळे आणि शिवसेनेचे बाळू धानोरकर यांच्यातच सामना रंगणार असल्याचे दिसून येते. चिमूर सोडून ब्रह्मपुरीत दाखल झालेले काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार भाजपचे आमदार अतुल देशकर यांच्या तोंडाला फेस आणतील.
चिमूरमध्ये रंगतदार सामना
चिमूरमध्ये भाजपचे बंटी भांगडिया आणि काँग्रेसचे अविनाश वारजूरकर यांच्यातील सामना रंगतदार वळणावर पोहोचला आहे.

वर्धा - ०४ जागा
सहकार नेते सुरेश देशमुख संकटात
वर्धा मतदारसंघात मागील वेळेस अपक्ष म्हणून निवडून आलेले सहकार नेते सुरेश देशमुख या वेळी सहकार क्षेत्रातून होत असलेल्या विरोधामुळे संकटात सापडले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे राहुल शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे आणि राष्ट्रवादीचे सुरेश देशमुख असा त्रिकोणी सामना रंगला असून शेंडे यांना संधी मिळू शकते. आर्वी मतदारसंघात भाजपचे दादाराव केचे आणि काँग्रेसचे अमर काळे यांच्यातच थेट लढत दिसत असून ती कुठल्याही बाजूने झुकण्याची चिन्हे आहेत. देवळीत काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे आणि भाजपचे सुरेश वाघमारे यांच्यात जातीय समीकरण रंगण्याची चिन्हे आहेत. हिंगणघाट मतदारसंघात शिवसेनेचे अशोक शिंदे आणि भाजपचे समीर कुणावार अशी थेट लढत होईल.
कांबळेंची प्रतिष्ठा पणाला
काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांना प्रतिष्ठेसाठी झुंज द्यावी लागणार आहे. भाजपचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.