आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Select Its Candidates Through Open Method, Rahul Gandhi Declared At Sevagram

काँग्रेस उमेदवाराची निवड खुल्या पद्धतीने,राहुल गांधी यांची सेवाग्राममध्ये घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - देशातील 15 लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार खुल्या पद्धतीने निवडण्यात येतील. कार्यकर्ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी निवडलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास नंतर देशभर हीच पद्धत राबवली जाईल, अशी घोषणा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सेवाग्राम येथे केली. ‘पीपल्स मॅनिफेस्टो’ या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांचे सदस्य तसेच स्वयंसेवकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राहुल म्हणाले, काँग्रेस पक्ष हा संघटना नसून एक विचार आहे. प्रेम, सद्भाव आणि परस्परांचा आदर करणारा हा विचार आहे. तो संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, कालौघात तेच संपले. विचार मात्र कायम राहिला. पक्षाच्या जाहीरनाम्यावरही त्यांनी भाष्य केले. पूर्वी जाहीरनामा बंद खोलीमध्ये तयार व्हायचा. विरोधी पक्षात पाच-सहा नेते तो तयार करतात. काँग्रेसने मात्र नवीन उपक्रम सुरू केला असून यात युवक, महिला सर्वांना विचारात घेतले जात आहे. यापुढे सर्वांच्या विचारानेच जाहीरनामा तयार करण्यात येईल.
या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, सहप्रभारी वाल्मीकी, खासदार दत्ता मेघे, राज्यमंत्री रणजित कांबळे उपस्थित होते.
एक व्यक्ती देश चालवू शकत नाही
एक व्यक्ती देश चालवू शकते असा कुणी दावा करत असेल तर ती निव्वळ धूळफेक आहे, असे सांगत राहुल यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. विकासाभिमुख दृष्टिकोनातून देश चालवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊनच चालावे लागेल, असे ते म्हणाले.
सरपंच बनणार राजकीय पीसीओ
प्रत्येक नागरिकाच्या हातात मोबाइल फोन असावा, हे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे. आता पंचायत राजच्या रूपात ग्रामीण भागात काम करणार्‍या सरपंचांना अधिकार आणि ताकद देऊन त्यांना राजकीय पीसीओ बनवले जाईल, अशी ग्वाही राहुल यांनी दिली.
चिमुकल्यांशी संवाद
सेवाग्राम आश्रमाच्या नई तालीम परिसरातील आनंद निकेतन विद्यालयातील चिमुकल्यांशी राहुल यांनी संवाद साधला. पंधरा मिनिटांच्या या भेटीमुळे आनंदलेल्या चिमुकल्यांना आभाळ ठेंगणे वाटत असल्याचा भास होत होता.
आश्रमात एक तास
राहुल यांनी सव्वापाच तासांच्या दौर्‍यापैकी एक तास सेवाग्राम आश्रमात घालवला. त्यांनी आश्रम परिसराची पाहणी करत प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी बापू-कुटीत प्रार्थनाही केली.
पंचायत राज सक्षम हवे
यापूर्वी 5000 लोकच देश चालवत होते. आता हे 750 खासदार आणि सुमारे 4500 आमदार देश चालवू शकत नाहीत. पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 30 लाख प्रतिनिधींची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. भविष्यात निर्णयप्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचे मत प्राधान्यक्रमाने विचारात घेतले जाईल.