नागपूर - ‘देशाची प्रगती साधणे हे केवळ सरकारचे काम नसून ती एक संवैधानिक व्यवस्था आहे. देशाचा खरा मालक तेथील समाजच असताे. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी समाजाला तयार राहावे लागेल अाणि समाज तयार करण्याचे काम संघ परिवार करत आहे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी
व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथे आयोजित अखिल भारतीय वर्गाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. कर्नाटक येथील धर्मस्थळ पीठाचे धर्माधिकारी पद्मभूषण वीरेंद्र हेगडे समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘संघाला स्वत:ला काहीही नको. समर्थ, संपन्न भारत उभा करणे हेच आमचे प्रमुख लक्ष्य आहे. मात्र, संघाची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून तसा प्रयत्न करणा-यांवर दया येते. त्यांचे अज्ञान लवकर दूर व्हावे,’ असा टोलाही डॉ. भागवत यांनी टीकाकारांना लगावला.
देश उभा करायचा असेल तर समाजाला सक्रियपणे उभे राहावेच लागेल. संघाचा प्रभाव वाढवण्याचे आमचे प्रयत्न नसून देशाचा प्रभाव वाढवणे हे संघाचे काम आहे. आपला देश बदलतो आहे. तो शक्तिसंपन्न होत आहे. सा-या जगाच्या भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
विश्वासार्हतेमध्ये सा-या जगात अाज अापला भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे. भारत सामर्थ्यसंपन्न व्हावा, ही आता आमचीच नव्हे तर सा-या जगाची इच्छा अाहे. त्यामुळे देश सामर्थ्यसंपन्न करण्याची हीच वेळ असल्याचे सरसंघचालक म्हणाले.
पुढे वाचा, याेग दिनाचा प्रस्ताव माेदींमुळेच मान्य
याेग दिनाचा प्रस्ताव माेदींमुळेच मान्य
विश्वयोग दिवसाचा उल्लेख करताना डॉ. भागवत म्हणाले, ‘प्रथमच भारताचा प्रस्ताव बहुमताने मान्य झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी प्रयत्न केले नसते तर ते शक्य झाले नसते,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशात राष्ट्रीय भाव जागविण्यात संघाचे मोठे योगदान आहे, असे मत प्रमुख पाहुणे वीरेंद्र हेगडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासह अनेकांनी विशेष उपस्थिती लावली.