आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा पाच लाखांच्या चोरीतील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- श्यामनगर परिसरात राहणार्‍या उद्योजकाच्या घरात दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी लक्ष्मीमूर्तीसह सव्वा पाच लाखांची चोरी झाली होती. या प्रकरणातील दोघांना गुन्हे शाखा आणि फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.
उद्योजक सुमीत खंडेलवाल यांच्या घरात दिवाळीनिमित्त पूजनासाठी दोन चांदीच्या लक्ष्मीमूर्ती मांडल्या होत्या. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी, पाच नोव्हेंबरला मध्यरात्री चोरट्यांनी खंडेलवाल यांच्या घरात जाऊन दोन चांदीच्या मूर्ती, सोन्याचे दागिने, रोख असा एकूण पाच लाख 29 हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा पोलिस मागील काही दिवसांपासून कार्यरत होते. बुधवारी गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले. त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची शंका फ्रेजरपुरा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनीही खंडेलवाल यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली आहे. या वेळी अजूनही काही सहकारी सोबत होते, अशी माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली आहे. संशयित चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आता उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या चोरीची शहरात चर्चा होती. माहितीच्या आधारे पोलिस लवकरच उर्वरित आरोपी आणि चोरीला गेलेला ऐवज जप्त करण्यात यश मिळवणार असल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार रियाजोद्दीन देशमुख यांनी सांगितले.