आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या कारागृहात सर्रास मिळते दारू, गांजा, चरस कैद्यांच्याच ‘सोयी’चा अधीक्षकाचा कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘मकोका’ लावण्यात आलेले पाच कुख्यात कैदी पळून गेल्यामुळे देशभर चर्चेत आलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधीक्षक वैभव कांबळे यांचा काही वर्षांपासून या तुरुंगात मनमानी कारभार सुरू होता.
कैद्यांसोबतच तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्यासाठी ते भक्कम ‘वसुली’ करत होते, प्रभारी कारागृह उपमहानिरीक्षकपदी असतानाही त्यांनी या अधिकारांचाही गैरवापर केला होता,’ अशी धक्कादायक माहिती त्यांच्याविरोधात दाखल काही तक्रारींमधून समोर आली आहे.
वैभव कांबळे यांच्याविरुद्ध तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी तुरुंग उपमहानिरीक्षक कार्यालयाकडे ५३ तक्रारी केल्या. या सर्व तक्रारी राज्य सरकारच्या गृह विभागाला सादर केल्याची कबुली बुधवारी अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी माध्यमांसमोर दिली. या ५३ तक्रारींमध्ये काय दडलंय? याचा शोध घेण्याचा ‘दिव्य मराठी’ने प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव समोर आले.
कांबळे यांच्या आशीर्वादाने कैद्यांना तुरुंगात दारू, गांजा, चरस, मोबाइलची सेवा मिळत होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी कारागृहाच्या सुरक्षा रक्षकांनी कैद्यांकडून शंभरावर मोबाइल ताब्यात घेतले होते. ते सर्व मोबाइल एका बादलीमध्ये ठेवले होते. कालांतराने ते सर्व मोबाइल कैद्यांना परत देण्यात आले. या प्रकरणात काही तुरुंगाधिकारीही सामील आहेत.’

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीकडे सापडला दीड किलो गांजा
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ ‘डॅडी’ हा नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. पाच कैदी पळण्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे २८ मार्च रोजी अरुण गवळीकडे दीड किलो गांजा सापडला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत कांबळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मोबाइल वापरत नाही. त्यामुळे त्यांच्या बंगल्यातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता त्यांच्या पत्नीने ‘ते झोपले असून, तुमचा संदेश देते,’ असे सांगितले.
दोन तुरुंगाधिकारी निलंबित

कैदी पळून गेल्याच्या घटनेला जबाबदार धरत मीरा बोरवणकर यांनी गुरुवारी आर. जी. पारेकर व एस. यू. महाशिकरे या दोन तुरुंगाधिकाऱ्यांनाही निलंबित केले. तर निलंबित अधीक्षक वैभव कांबळे यांचा सहायक आशिष धुसकुटे व तुरुंगाधिकारी प्रदीप रणदिवे यांच्यावरही कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उपमहानिरीक्षकांनी दिला दुजोरा

तुरुंग उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनीही कांबळेंबाबतच्या तक्रारींमध्ये तथ्य असण्याला दुजोरा दिला. परंतु सध्या तपास सुरू असल्यामुळे अधिकची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
वैभव कांबळे यांच्या विरोधातील तक्रारी

- तुरुंग पोलिस उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे रजेवर असताना वैभव कांबळे यांच्याकडे उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. या पदावर प्रभारी अधिकाऱ्याला केवळ आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार असतात. परंतु कांबळे यांनी २० फेब्रुवारी २०१४ रोजी अश्विन चिंतामण शंभरकर याचा भ्रष्टाचारातील दोन वर्षांत शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला ८५ दिवसांची विशेष शिक्षा माफी दिली. त्याच दिवशी एकूण सहा कैद्यांची त्यांनी शिक्षा माफ केली. उपमहानिरीक्षकांच्या अनुपस्थितीत कांबळे यांनी अनेक कैद्यांना लाभ पोहोचवल्याचेही तक्रारींमध्ये नमूद केले आहे.
- १ जानेवारी ते १९ सप्टेंबर २०१४ या काळावर पदावर रुजू न होता बेपत्ता असलेले तुरुंगाधिकारी आर. जी. पारेकर यांची २७२ दिवसांची रजा मंजूर केली.
- नागपुरातून वर्धा तुरुंगात बदली झालेल्या कविता निमकर या महिला रक्षकाला मुक्तिपत्र देण्यासाठी वैभव कांबळेने लाच मागितली होती, असा आरोप करणारी तक्रारही राज्य सरकारकडे केली आहे.
- तुरुंगातील महिला रक्षक नंदिनी वरठे यांना मुक्तिपत्र देण्यासाठी केला होता मानसिक छळ.
अनेक कैद्यांकडे मोबाइल, घातक शस्त्रही
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहातील शेकडो कैद्यांकडे मोबाइल आणि चाकूसारखी शस्त्र आहेत. यात प्रामुख्याने कुख्यात डल्लू सरदार, लोकांना कोट्यवधींनी लुबाडणारे श्रीसूर्याचे संचालक समीर जोशी, वासनकर इन्व्हेस्टमेंटचे प्रशांत वासनकर, राजा गौस यांच्याकडे आजही मोबाइल आहेत. अधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून शोधले, तर शेकडो मोबाइल सापडतील, असेही सांगितले जाते.