नागपूर - देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांची हत्या करणा-या नथुराम गोडसे याचा जन्मदिवस भाजप सरकारकडून ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा करण्याच्या कल्पनेवर जोरदार टीका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपच्या या घटनाबाह्य विचारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
आव्हाड म्हणाले की, भारतीय संविधानानुसार गोडसे हा खुनी आहे. तो एकप्रकारे देशातील पहिला आतंकवादी आहे. अशा खुनी माणसाचा जन्मदिवस ‘शौय दिन’ म्हणून साजरा करण्याची कल्पनाही करू शकत नाही. जर हे सत्य असेल तर भाजपच्या विचारसरणीची कीव करावी लागेल. भाजप हे एका खुन्याचं उदात्तीकरण करीत असून देशाची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, हे यावरून स्पष्ट होते. सरकारच्या अशा कृत्यामुळे नाइलाजास्तव ‘गांधी हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है’ असे म्हणावे लागते आहे. भाजपच्या सरकारने भावनात्मक राजकारण करण्यापेक्षा विकासात्मक राजकारण करावे, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.
धनाढ्यांचे सरकार- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गोसीखुर्द प्रकल्पातील कंत्राटदार रामाराव याच्यासोबत तिरुपतीला जातात, यावरून असे स्पष्ट होते की हे सरकार धनाढ्यांचे आहे. या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणा-यांचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. मुंबईच्या विकासासाठी समिती स्थापन करून त्या समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधानांना नेमणे हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा मोदींचा डाव आहे. त्यांचा हा डाव राष्ट्रवादी यशस्वी होऊ देणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.
खुन्याचा गौरव करणे चुकीचे- नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली. संविधानाच्या दृष्टीने गोडसे हा गुन्हेगार आहे.
आपली संस्कृती कोणत्याही गुन्हेगाराचा गौरव करण्याची परवानगी देत नाही. नथुरामचा जन्मदिवस ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा करणे चुकीचे आहे. भाजपने विकासाची स्वप्ने दाखवली. लोकांनीही त्यांना निवडून दिले. त्यामुळे भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ जाहीर करणे, मुस्लिमांचे धर्मांतर करणे अशी कृत्ये टाळून भाजपने लोकांना दाखवलेली स्वप्ने पूर्ण करावीत, अशी टीका एमआयएमचे औरंगाबाद येथील आमदार इम्तियाज जलील यांनी केली.
गोडसेच्या नावे 'शौर्य दिन', राज्यसभेत प्रचंड गदारोळ, वाचा पुढे...