मालूर, मेळघाट - आदिवासींकरिता सुरू करण्यात आलेल्या योजना शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी भागामध्ये पोहोचत नसल्याचा अनुभव दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी मेळघाटामध्ये आला. त्यामुळे व्यथित झालेल्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेच्या बैठकीत सर्व अधिकार्यांसमोर जाहीर नाराजी व्यक्त केली. मेळघाटातील आदिवासी जनतेला चांगली सेवा द्या, अशा निर्देशवजा सूचना त्यांनी अधिकार्यांच्या बैठकीत दिल्या. मेळघाटातील जनतेमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबतीत कमालीचा रोष असल्याचे फडणवीस यांनी अधिकार्यांच्या बैठकीत आवर्जुन सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मेळघाटात दौरा केला.
मेळघाटातील हरिसाल, मालुर, राणा मालुर आणि चौराकुंड येथील दुर्गम भागात असलेले अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासींच्या घरी आणि रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चार गावांत मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार घेतला. या वेळी उद्योगमंत्री प्रकाश मेहता, प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी उपस्थित होते.