आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात लाचखोरांच्या तक्रारीसाठी डायल करा ‘1064’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर -देशातील वाढते घोटाळे आणि सरकारी कारभारातील दैनंदिन भ्रष्टाचार आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘1064’ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आपल्याला लाचखोराविरोधात तक्रार दाखल करता येईल, अशी माहिती ‘एसीबी’चे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली.

प्रत्येक जिल्हा स्तरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यान्वित आहे. परंतु प्रत्येक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक वेगवेगळा आहे. अनेकांना हा क्रमांकच माहीत नसतो. शिवाय ग्रामीण भागातील लोक या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे राज्यात भ्रष्टाचारविरोधी कारवायांचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याचे दिसून येते. हे प्रमाण वाढवण्यासाठी व लाचखोरीला आळा घालण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘1064’ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.

भ्रष्टाचार कमी करण्यास मदत
सध्या सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्येक कामांसाठी लाच मागण्यात येते. परंतु अनेक नागरिक एसीबी कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही. टोल फ्री क्रमांक प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीत राहण्यासारखा आहे. त्यामुळे एसीबी कार्यालयाकडे तक्रारी वाढतील आणि अधिकाधिक लाचखोरांना बेड्या ठोकण्यात आम्हाला यश येईल. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना जरब बसेल आणि भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास नागपूर एसीबी विभागाचे उपअधीक्षक संजय पुरंदरे यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांत होणार राज्यात ‘फूल फ्लेज’
एसीबीचा टोल फ्री क्रमांक सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत तो फूल फ्लेज कार्यान्वित होणार आहे. नागरिकांना 24 तास तक्रार देणे शक्य होणार आहे. यामुळे भष्टाचाराला पायबंद घालणे शक्य होईल असा दीक्षित यांचा दावा आहे.