आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्काराची तयारी करतानाच तो उठून बसला, नागपूरातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आप्तस्वकीय शोकमग्न असताना घरासमोर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच मृत व्यक्ती अचानक उठून बसल्याची चित्रपटात शोभेल अशी घटना मंगळवारी नागपुरातील पोलिस लाइन टाकळी परिसरात घडली. या घटनेने काही क्षण हादरलेल्या नातेवाइकांनी तत्काळ या व्यक्तीला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विनोद धरपाल (34) असे या युवकाचे नाव आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल असलेल्या विनोदला कर्करोग आहे. मागील काही वर्षांपासून त्याच्यावर नागपुरातील डॉ. जय देशमुख यांच्याकडे उपचार सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यापासून तो डॉ. जय देशमुख रुग्णालयात भरती होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृतीही चिंताजनक होती. मंगळवारी सकाळी कनिष्ठ डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे धरपालचे कुटुंबीय सांगतात. त्यामुळे शोकाकुल कुटुंबीयांनी सकाळी साडेदहा वाजता विनोदला घरी नेले. काही क्षणातच आप्तस्वकीय, नातेवाईक विनोदच्या घरी पोहोचले. अनेकांनी त्याचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली.
विनोदला घरातील समोरच्या खोलीत ठेवण्यात आले होते. शोकाकुल महिला त्याच्या भोवती गोळा झाल्या होत्या. अचानक एका वृद्ध महिलेने विनोदच्या पोटावर हात ठेवला असता हालचाली सुरू असल्याचे त्यांना जाणवले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला. हा प्रकार सदर महिलेने इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाचाही विश्वास बसला नाही. विनोदला अखेरचे पाणी पाजण्याचे प्रयत्न सुरू असताना तो पाणी पिऊ लागल्याने सर्वजण चकित झाले. नेमके काय घडतेय, यावर त्यांचा विश्वासच बसेना. नातेवाइकांनी त्याला आधार देऊन उठवून बसवले, तेव्हा विनोदने खाडकन डोळे उघडले. उपस्थित मंडळींचे डोळेच पांढरे झाले, तातडीने त्याच्या नाकातील कापसाचे बोळे काढण्यात आले. शोकाकूल कुटुंबियांच्या चेह-यावर आश्चर्य अन् हास्य उमटले.
ठाण्यात मृत्यूची नोंद
विनोद हा इमामवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. नातेवाइकांनी त्याच्या कथित मृत्यूची माहितीही पोलिस ठाण्याला दिली होती. पोलिसांनी स्टेशन डायरीत विनोदच्या मृत्यूची नोंद केली. अनेक कर्मचारी अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले होते, हे विशेष.