नागपूर - दिल्लीहून मुख्यमंत्रिपदी लादले गेलेले पृथ्वीराज चव्हाण
आपल्या कारकीर्दीत टीम राज्यात बनवू शकले नाहीत आणि आता विधानसभेतही भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचे सोडून सतत
मोबाइलवर व्यग्र राहत असल्याने अनेक काँग्रेस आमदार त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ आमदाराने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यासारख्या नवख्या मंत्रीही तत्कालीन आघाडी सरकारचे वाभाडे काढतात. तुमच्याच काळात निर्णय झाल्याचे सांगतात तेव्हा पृथ्वीराज चव्हाण पक्षाची बाजू न मांडता गप्प बसतात. सभागृहात ते शांतपणे येतात, विखे पाटील यांच्या बाजूला बसतात आणि मान खाली घालून मोबाइलवर काम करत असतात. सभागृहात काय चालले आहे याकडे त्यांचे जराही लक्ष नसते. कुठल्याही गोष्टीवर हात वर करून ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्व नेते मात्र सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत, असेही या आमदाराने सांगितले.
आघाडी सरकारने घेतलेले विविध निर्णय आणि योजनाच भाजप सरकार पुढे चालवत आहे आणि आपल्या भाषणात ते याची जाणीवही करून देतात, असे सांगून हे आमदार म्हणाले, मुख्यमंत्रिपदी असलेल्या नेत्याने खरे तर काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे, कारण सर्व योजना या त्यांनीच वेळ घेऊन मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे ते जास्त चांगल्या पद्धतीने बचाव करू शकतात, परंतु ते असे काहीही करीत नाहीत.
बाेलावे वाटते, पण बोलायचे नाही
पृथ्वीराज चव्हाण यांच्या अत्यंत नजीकच्या एका आमदाराने सांगितले, पृथ्वीराज चव्हाण यांना बरेच काही बोलायचे असते, परंतु त्यांना आता बोलावेसे वाटत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी जेव्हा ते बोलायला उभे होते, तेव्हा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वेळ संपल्याने त्यांच्या समोरील माइक बंद केला, तेव्हापासून ते चिडलेले आहेत. एका माजी मुख्यमंत्र्याला भाजपद्वारा दिलेली वागणूक त्यांना आवडलेली नाही. एकूणच मुख्यमंत्रिपदी असतानाही पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आमदार, मंत्र्यांच्या जवळ नव्हते आणि आता विधानसभेतही काँग्रेस आमदार त्यांना जवळचे मानत नाहीत, हेच दिसून येत आहे.