आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक लाख 39 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मोफत गणवेश वाटप निधी योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील एकूण 2,764 शाळांमधून एक लाख 39 हजार लाभार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर पाच कोटी 54 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

उपरोक्त गणवेशाचा दोन कोटींचा निधी शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आला आहे, तर उर्वरित रक्कम जिल्हास्तरावर अनुदान प्राप्त होताच संबंधित शाळांना हा निधी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, प्रत्येक लाभार्थ्याला गणवेशासाठी चारशे रुपये अनुदान शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीलाच तयार गणवेश विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे. यामध्ये सर्वच मुलींना गणवेशाचे मोफत वाटप करण्यात येईल, तर मुलांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेश मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, शिक्षणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

असा राहील शाळेचा पहिला दिवस
सकाळी सात वाजता सर्वांची शाळेत उपस्थिती. त्यानंतर गाव, वॉर्डातून प्रभातफेरी निघेल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना फेरीत सहभागी होण्याची विनंती केली जाईल. सकाळी आठ ते नऊच्या सुमारास पाठ्यपुस्तकांचे वाटप त्याचप्रमाणे पहिलीत प्रवेश घेतलेल्या बालकांचा फुले देऊन स्वागत केले जाईल. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रतिज्ञा घेण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनास प्रारंभ होणार आहे."
पहिल्या दिवशी होणार वाटप
४ शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे आदेश संबंधित शाळाप्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे. कायम विनाअनुदानित शाळांना मात्र कुठल्याच योजनांचा लाभ मिळालेला नाही.
श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.

पाठ्यपुस्तकांचे झाले 93 टक्के वाटप
गणवेशाप्रमाणेच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात 93.61 टक्के पाठ्यपुस्तकांचे वाटप झाल्याचे सर्वशिक्षा अभियान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उर्वरित काही वर्गांचे काही विषयांची पाठ्यपुस्तके अप्राप्त असल्याने 25 जूनपूर्वी शाळास्तरावर पाठवण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

आज होईल शाळेची साफसफाई
सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांसह शिक्षक बुधवारी (दि. 25) शाळेत उपस्थित राहतील. शाळा परिसर स्वच्छ करणे, पाना-फुलांची तोरणे, ध्वनिवर्धकावर देशभक्तीवर गीत वाजवणे तसेच पालकांना सूचित करण्याचे काम करतील.