आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदार, संघटनांची ओरड निवडणुकीवेळीच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीमध्ये नावे नसल्यामुळे चांगलीच ओरड झाली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेंतर्गत शनिवारपासून पुन्हा दोनदिवसीय मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. मात्र, मागील आठवड्याप्रमाणेच या मोहिमेलाही थंड प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी करण्यासाठी ही एक चांगली संधी असताना काही मतदार याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. वेळेवरची असुविधा टाळण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिक आणि प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी अमरावतीच्या 46 हजार मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या सर्व नागरिकांकडे निवडणूक आयोगाची ओळखपत्रे होती; परंतु मतदार यादीत नावेच नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने विशेष दखल घेत त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवायला सांगितली.

त्या सूचनेनुसार, अमरावती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात स्वतंत्र मदत केंद्र उघडण्यात आले. ज्यांचे फोन नंबर्स प्राप्त झाले, त्यांच्याशी मतदार नोंदणी अधिकारी या नात्याने खुद्द एसडीओ प्रवीण ठाकरे यांनी संवादही साधला. मात्र, तरीही मतदारांचा हवा तसा प्रतिसाद दिसून आला नाही. दरम्यान, विशेष मोहिमेचा भाग म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघातील सर्व 245 केंद्रांवर शनिवारी सकाळपासून मतदार नोंदणी सुरू झाली. नोंदणीशिवाय पत्त्यातील व नावांतील बदल नोंदवून घेण्याचे कामही या केंद्रांवरून सुरू आहे. 6,7, 8 व 8अ हे चारही प्रकारचे अर्ज या केंद्रांवर उपलब्ध असून, ते भरणार्‍यांची स्वतंत्र नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नोंदणी आजही सुरू
रविवारी (दि. 29) दिवसभर मतदार नोंदणीचे कार्य सुरू राहील. 30 जूनपर्यंत प्राप्त सर्व प्रकारच्या अर्जांवरील हरकती व सूचना 15 जुलैपर्यंत निकाली काढाव्यात, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानंतर ‘डाटा फीडिंग’ करण्यात येणार आहे. अशाप्रकारे सर्व कामे आटोपल्यानंतर 31 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.
सोमवारी कळेल आकडा : मतदार नोंदणीच्या विशेष अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद थंड असला, तरी शनिवार-रविवार या दोन दिवसांत किती जणांनी अर्ज दाखल केले, याची माहिती सोमवारी स्पष्ट होणार आहे. गत आठवड्यातील नोंदीही या वेळी कळतील, असे यंत्रणेचे म्हणणे असून, त्यासाठीची जुळवाजुळव केली जात आहे.