आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Suresh Bhatt, Vitthal Wagh, Nagpur

कवी सुरेश भट, विठ्ठल वाघ यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पदरी निवडणुकीत अपयशच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विठ्ठल वाघ - Divya Marathi
विठ्ठल वाघ

नागपूर - ‘आम्ही चिंध्या पांघरून
सोनं विकायला बसलो
गि-हाईक फिरकता फिरकेना
सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो
गि-हाईक पेलवता पेलवेना’
असे म्हणणारे कवी सुधाकर गायधनी असो वा
‘आम्ही मेंढरं... मेंढरं यावं त्यानं हाकलावं
पाचा वर्साच्या बोलीनं व्हते आमुचा लिलाव’
असे म्हणून मतदारांना जागृत करणारे विठ्ठल वाघ असो की,
‘यार तुझ्या भटकेपणाची
खूपच कमाल झाली
शिवसेना, राजद, काँग्रेस करता करता
ओबीसी बहुजन महासंघ झेली’
असे म्हणत निवडणूक लढवून पाहणारे ज्ञानेश वाकुडकर असो. या सर्व कवींनी एकदा तरी निवडणूक लढवून पाहिली. पण खादी पांघरून मते मागणा-यांची झोळी रिकामीच राहिली.
‘आम्ही चोपड्या घेऊन
कविता वाचन केले
रसिक हलता हलेना !
आम्ही खादी पांघरून
निवडणूक लढवली
मतदार फिरकता फिरकेना’
असे म्हणण्याची वेळ या कवींवर आली. कवी यशवंत मनोहर यांनी भारिपतर्फे 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली, तर राष्‍ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाच्या बॅनरवर ज्ञानेश वाकुडकर उभे होते.
‘त्यांच्या कळपात येण्यासाठी,
कावळे आग्रह धरतात
पण सामील होणा-याला
टोचून टोचून मारतात’
असा अनुभव यापूर्वी आलेल्या वाकुडकरांनी 2009 ची लोकसभा लढवली. विदर्भ आणि राज्यात अशा अनेक कवी आणि साहित्यिकांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या. पण त्यांची कवी म्हणून असलेली लोकप्रियता त्यांना मते मिळवून देऊ शकली नाही
‘सूर मागू तुला मी कसा
जीवना तू तसा मी असा’
असे म्हणणा-या सुरेश भटांनाही निवडणुकीचा सूर काही सापडला नाही. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाकडून पश्चिम नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढवणा-या भटांना पराभूत व्हावे लागले. ‘काळ्या मातीत तिफण हाकता हाकता’ 1997-98 मध्ये विठ्ठल वाघ यांनी अकोला येथून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांच्या पदरीही अपयशच आले.
‘मी गोसावी दारोदारी
सुखे मागत फिरतो आहे
दार असे सापडले नाही
जिथे दु:ख भेटले नाही’
असे म्हणणा-या फ. मुं. शिंदे यांनी साहित्य संमेलनाची निवडणूक जिंकली. पण विधानसभेची जागा त्यांना राखता आली नव्हती. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून ते निवडणूक लढले होते.
महाकवी सुधाकर गायधनी यांनी सजपाच्या तिकिटावर रामटेक मतदारसंघातून लोकसभा, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांनी 1990 मध्ये आरपीआय-काँग्रेसच्या तिकिटावर नागपुरातून विधानसभा निवडणूक लढवली होती. आदिवासी साहित्य ही संकल्पना रूढ करणारे नेताजी राजगडकर यांनी राळेगाव येथून विधानसभेची निवडणूक लढवली होती. ते एकदा निवडूनही आले होते.


महानोर, फुटाणे मात्र लकी
प्रसिध्द निसर्गकवी ना. धों. महानोर व रामदास फुटाणे यांना आमदारकीची संधी मिळाली असली तरी त्यांना निवडणूक लढवावी लागली नाही. थेट विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागली. कवी विष्णू सूर्या वाघ गोव्यातून भाजपतर्फे निवडून आले आहेत. पण मनासारखे पद न मिळाल्याने ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. साहित्यिकांचे राजकारण राजकारण्यांच्या राजकारणापेक्षा गहन आणि भीषण असले तरी लोकानुनयाच्या राजकारणात त्यांना हातपाय मारता आले नाहीत, एवढे मात्र खरे.