आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Ticket Distributed To Only Clean Character Candidate Devendra Phadanvis

राज ठाकरेंनी चर्चेतील प्रत्‍येक शब्‍द जाहीर करावाचः देवेंद्र फडणवीस यांचे आव्‍हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - 'राज ठाकरे यांच्यासोबत झालेली सगळी चर्चा फक्त आणि फक्त राजकीयच होती. त्यातील प्रत्‍येक शब्‍द राज ठाकरे यांनी जाहीर करावाच, असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्‍यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍यावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वीच भाजपचे माजी अध्‍यक्ष नितीन गडकरी यांनीही युतीमध्‍ये चौथ्‍याचा विषय संपला आहे, असे 'दिव्‍य मराठी'ला दिलेल्‍या विशेष मुलाखतीत स्‍पष्‍ट केले होते.

‘नागपूर मिट द प्रेस’ कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, गुन्हेगारांना तिकीट देऊ नये, असे आपले स्पष्ट मत आहे. यापूर्वी आपण ते पक्षाच्या विविध स्तरावर मांडलेदेखील आहे. राजकीय गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांचा अपवाद करता येईल, परंतु गंभीर स्वरूचाचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या लोकांना तिकीट न देण्याचे आपले धोरण राहील. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांनाच भाजप उमेदवारी देणार आहे. गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांचा विचारही केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.

सत्तांतर घडवणारच
जनतेत सरकारविरोधी मूड असल्याचा दावा करताना फडणवीस म्हणाले की, विरोधी मतांचे विभाजन होऊ नये यासाठीच महायुतीचे प्रयत्न झाले. याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा नाही. आम्ही कोणाची वाट पाहत नाही. भाजप, शिवसेना आणि रिपाइं युती सत्तांतर घडवण्यास सक्षम आहे, असा दावाही त्यांनी केला. ईस्टर्न फ्री वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचे की शिवसेनाप्रमुखांचे, असा वाद होण्याचे कारण नाही. अशा मागण्या करणा-यांनी अद्याप आमच्याशी या विषयावर संपर्क साधलेला नाही, असे सांगत या विषयावर जास्त बोलण्याचे फडणवीस यांनी टाळले.

ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच भाजप राज्यात निवडणुका लढवणार आहे. माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही यापूर्वीच याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. निवडणुकीत आठ कोटी खर्च केल्याबद्दल मुंडेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. निवडणूक आयोगापुढे स्पष्टीकरण दिल्यावर हे प्रकरण मिटेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.


वेगळा विदर्भ होईलच
आम्ही आजही विदर्भवादी आहोत. छोट्या राज्यांच्या निर्मितीला भाजपने नेहमीच पाठिंबा दिला आहे. ज्या वेळी भाजपकडे पुरेसे बहुमत असेल त्या वेळी विदर्भ राज्य निश्चित होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


‘गुजरात पॅटर्न’ महाराष्‍ट्रात
राज्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी निवडणुकीचा ‘गुजरात पॅटर्न’ राबवला जाणार आहे. सोशल साइट्सच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे उभारणे, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दहा हजार लोकांशी सातत्याने संपर्क साधला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.