चंद्रपूर - ताडोबा-अंधारी प्रकल्पातील चौदा महिन्यांच्या गणेश हत्तीचा हरपीस व्हायरसने शुक्रवारी मृत्यू झाला. लाडक्या गणेशच्या मृत्यूमुळे पर्यटक आणि ताडोबा प्रशासनात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पातील सुशीला हत्तीणीच्या पोटी चौदा महिन्यांपूर्वी गणेशचा जन्म झाला होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्याचे नाव गणेश ठेवण्यात आले होते.
सुशीला, लक्ष्मी व गजराज पर्यटकांना जंगल सफारीसाठी घेऊन जायचे तेव्हा गणेश एकटाच मोहुर्लीच्या हत्तीघरात खेळत राहायचा. शुक्रवारी सकाळी गणेशची प्रकृती बरी नसल्याची नोंद मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे यांनी घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी ताडोबा गाठून गणेशवर उपचार सुरू केले. परंतु गणेश उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. शुकवारी दुपारी 4 वाजता गणेशचा मृत्यू झाला. हरपीस व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी होते व अवघ्या काही तासांत त्याचा मृत्यू होतो, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर गणेशवर मोहर्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.