आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everything For Marriage : Name ,religion Changed

औरंगाबादच्या भामट्याने विवाहासाठी नाव ,धर्म बदलला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सात लाख रुपये व बंगला देण्याचे आमिष दाखवून तिसरा विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या औरंगाबादच्या भामट्याने आपले नाव व धर्मही खोटा सांगून युवतीच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शेख समीर शेख कासम असे आरोपीचे खरे नाव असून न्यायालयाने त्याची 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

यापूर्वीच दोन विवाह झालेल्या आरोपीने आपले नाव शामद पटेल असल्याचे सांगून अकोल्यातील एका 19 वर्षीय मुलीशी विवाह करण्याचा घाट घातला होता. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचा गैरफायदा घेत त्याने सात लाख रुपये व औरंगाबादेत बंगला देण्याचे आमिषही दाखवले होते. त्याला भुलून या कुटुंबीयांनी शुक्रवारी (दि. 8) आपल्या मुलीचा विवाह आरोपीसोबत लावला.

या आंतरधर्मीय विवाहाची माहिती मिळताच शिवसेना, भाजप, विहिंप कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे शनिवारी पत्नीसोबत दागिने खरेदी करत असताना पोलिसांनी त्याला सराफा दुकानातच अटक केली, तसेच त्याची इनोव्हा कारही जप्त करण्यात आली होती. रविवारी न्यायालयाने त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी शेखबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अकोल्याचे पोलिस पथक औरंगाबादला
रवाना झाले आहे.

गुजराती असल्याचे भासवून फसवले
आरोपीने आपले नाव व धर्म बदलून युवतीच्या कुटुंबीयांना फसवल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. आरोपीचे खरे नाव शेख समीर शेख कासम असल्याचे त्याच्या वाहन परवान्यावरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अकोल्यातील ज्या हॉटेलमध्ये आरोपी राहत होता तेथे त्याने एस.एस. पटेल नावाने रूम आरक्षित केली होती. आपण गुजराती असल्याचे भासवून त्याने युवतीसोबत विवाह केला होता. मात्र, काही संघटनांच्या सतर्कतेमुळे खरा प्रकार उजेडात आल्यानंतर संबंधित तरुणीने आरोपीविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली.