आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोगशील बळीराजाच ठरवणार आता राज्याचे कृषी धोरण !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्याचे कृषी धोरण ठरवताना आता प्रत्येक जिल्ह्यातील काही निवडक शेतक-यांशी चर्चा करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णयात शेतक-यांचा सहभाग असावा, यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. चर्चेनंतर वेगवेगळ्या भागांतील कृषी हवामानानुसार स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे.


राज्यात कृषी हवामानाचे नऊ विभाग आहेत. या विभागांनुसार कृषी विद्यापीठातील कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. हा अभ्यासगट प्रत्येक जिल्ह्यास भेट देऊन निवडक शेतक-यांशी कृषी विभागाच्या योजना व धोरणांबाबत चर्चा करील. प्रत्येक जिल्ह्यातील सरासरी दोनशे प्रयोगशील शेतक-यांचा यात सहभाग असेल. यामध्ये कृषी पुरस्कारप्राप्त शेतक-यांसोबतच पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, फळपिके, भाजीपाला यामध्ये प्रयोग करणा-या शेतक-यांचीही मते जाणून घेतली जातील. या माध्यमातून प्रयोगशील शेतक-यांच्या अभ्यासाचा व ज्ञानाचा फायदा राज्यातील इतर शेतक-यांना होण्यासाठी हा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरेल, असा कृषी विभागाचा दावा आहे. शेतक-यांच्या या अभ्यासगटाच्या शिफारशीनुसार, राज्यात कृषी उत्पादन वाढीसाठी विविध योजना व नियोजन हाती घेणे कृषी
विभागाला शक्य होणार आहे.


अभ्यासगटाचे कार्य
कृषी विद्यापीठातील कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील समिती वेगवेगळ्या विभागांतील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून शेतक-यांशी चर्चा करणार आहे. कृषी विभागाचे अधिकारीही या दौ-यांना उपस्थित राहतील. अभ्यासगट या भागातील शेती व उत्पादनवाढीबाबत झालेल्या चर्चेचा अहवाल प्रशासनाला देणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कृषी विभाग शेतक-यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन धोरणात्मक बदल करणार आहे.


कृषी हवामानावर आधारित धोरण
राज्याच्या सर्व भागांची परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे शेतक-यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शेतक-यांशी चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक विभागाच्या कृषी हवामानानुसार कृषी धोरण ठरवण्यात येणार आहे.
उमाकांत दांगट, कृषी आयुक्त, महाराष्ट्र.